बालके चोरुन नेणारे असल्याच्या संशयावरुन पती-पत्नीस मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 09:06 PM2018-06-14T21:06:44+5:302018-06-14T21:06:44+5:30

मागील पंधरा दिवसांपासून सोशल मिडियावर बालकांचे अपहरण करुन अवयव विकणारी टोळी सक्रीय असल्याची अफवा पसरविली जात आहे. या अफवेमुळे संपूर्ण जिल्ह्याभरातच दहशतीचे वातावरण आहे.

Pati-wife killed by suspected child | बालके चोरुन नेणारे असल्याच्या संशयावरुन पती-पत्नीस मारहाण

बालके चोरुन नेणारे असल्याच्या संशयावरुन पती-पत्नीस मारहाण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : मागील पंधरा दिवसांपासून सोशल मिडियावर बालकांचे अपहरण करुन अवयव विकणारी टोळी सक्रीय असल्याची अफवा पसरविली जात आहे. या अफवेमुळे संपूर्ण जिल्ह्याभरातच दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे गावात कोणताही अनोळखी पुरुष अथवा महिला आढळल्यास त्यांची विचारपूस न करता थेट संशय घेवून मारहाण करण्याच्या घटना घडत आहेत. दरम्यान असाच संशय घेत पती-पत्नीस मारहाण केल्याची घटना बुधवारी (दि.१३) रात्री तालुक्यातील कुंभारटोली येथे घडली.
प्राप्त माहितीनुसार कुंभारटोली येथे एका अनोळखी महिला व पुरुषाचा घेराव करुन बालके चोरुन नेणारे असल्याच्या संशयावरुन दोघांना जबर मारहाण करण्यात आली. दरम्यान आमगाव पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र पोलिसांनी केलेल्या चौकशीत ते दोघे पती-पत्नी असून गोंदिया जिल्ह्यातील अदासी (तांडा) येथील रहिवासी आहेत. परिस्थिती हलाखीची असल्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्यातील भंगार, खरडे, प्लास्टीक बॉटल इत्यादी गोळा करुन त्याच्या विक्रीतून मिळालेल्या पैशातून उदरनिर्वाह करीत असल्याची माहिती पुढे आली. रुपचंद देशमुख (४०) व पत्नी कविता रुपचंद देशमुख (३५) अशी त्यांची नावे आहेत. ते कुंभारटोली परिसरात पोहोचले असता परिसरातील लोकांनी बालके चोरी करणारे असल्याच्या संशयावरुन कसलीही शहानिशा न करता मारहाण केली. बालकांची चोरी करुन अवयव विकणारी टोळी सक्रीय असल्याच्या अफवेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असून त्यातूनच हा प्रकार घडल्याचे बोलले जाते.
अफवांना बळी पडू नका
जिल्ह्यात लहान बालकांचे अपहरण करुन त्यांचे अवयव चोरी करुन नेणारी टोळी सक्रीय असल्याची केवळ अफवा आहे. त्यामुळे नागरिकांनी या अफवेवर विश्वास ठेवू नये, तसेच कायदा हातात न घेता पोलिसांना याची माहिती द्यावी असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.

Web Title: Pati-wife killed by suspected child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.