मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात रुग्णाची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 09:38 PM2019-03-15T21:38:18+5:302019-03-15T21:39:27+5:30

विविध सोयी सुविधांच्या अभावामुळे नेहमी चर्चेत असणारे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जनरेटरची अद्यापही दुरूस्ती न करण्यात आल्याने येथील डॉक्टर मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात रुग्णाची तपासणी केली जात असल्याचा प्रकार शुक्रवारी (दि.१५) उघडकीस आला.

Patient check in light of mobile torch | मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात रुग्णाची तपासणी

मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात रुग्णाची तपासणी

googlenewsNext
ठळक मुद्देमेडिकलमधील प्रकार : केबल तुटल्याने समस्या, प्रशासनाचे दुर्लक्ष, समस्यांचा पाढा सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विविध सोयी सुविधांच्या अभावामुळे नेहमी चर्चेत असणारे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जनरेटरची अद्यापही दुरूस्ती न करण्यात आल्याने येथील डॉक्टर मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात रुग्णाची तपासणी केली जात असल्याचा प्रकार शुक्रवारी (दि.१५) उघडकीस आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा वीज पुरवठा मागील दोन दिवसांपासून खंडीत झाला आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयात रक्ताची तपासणी करण्यासाठी येणाऱ्या रुग्णांच्या रक्ताचे नमुने मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात घेतले जात आहे. तसेच या रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्युत पुरवठा सुरळीत झाल्यानंतरच रक्त तपासणीचा रिर्पोट घेण्यासाठी येण्याचा सल्ला दिला जात आहे. तर काही रुग्णांना रक्त तपासणीची रिपोर्ट बाहेरुन तपासणी करुन दिली जात असल्याची माहिती आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्याचा फटका केवळ प्रयोगशाळेलाच नव्हे तर इतर विभागाना सुध्दा बसत आहे. नेत्र तपासणी विभागात रुग्णांची तपासणी केली जात असून यासाठी मोबाईल टार्चचा वापर केला जात आहे. तर एखाद्या रुग्णांच्या तपासणीसाठी विजेची गरज असेल तर अशा रुग्णाला दुसऱ्या दिवशी येण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. वीज पुरवठा खंडित असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वच सेवेवर परिणाम झाला आहे.रुग्णांना केवळ पावती देण्यासाठी छोटासा युपीएस उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

एक्स-रे चे काम मोबाईल फोटोने
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आरोग्य तपासणीसाठी येणाºया रुग्णांना डॉक्टर गरज पडल्यास एक्स-रे काढण्याचा सल्ला देतात. मात्र विद्युत पुरवठा खंडीत असल्याने एक्स-रे मशिन सुध्दा बंद आहे.त्यामुळे डॉक्टर एक्स-रे विभागात जावून आपल्या मोबाईलने फोटो काढून काम चालवित असल्याची माहिती आहे. विद्युत पुरवठा खंडीत असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना सुध्दा मागील दोन दिवसांपासून मनस्ताप सहन करावा लागत आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला विद्युत पुरवठा करणाºया एक्सप्रेस फिडरचे केबल तुटल्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. तर जनरेटर बिघडले आहे काय याची माहिती घेतो. विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी युध्द पातळीवर काम सुरू आहे.
-व्ही.पी.रुखमोडे, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
सोनोग्राफी, एक्स-रे सेवा बंद
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला विद्युत पुरवठा करणाºया एक्स्प्रेस फिडरचे केबल तुटल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. परिणामी सोनोग्राफी, एक्स-रे सेवा पूर्णपणे बंद आहे. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर सर्व दारे व खिडक्या उघडून रुग्णांवर उपचार करीत असल्याचे चित्र होते. तर या संदर्भात विचारणा केली असता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला विद्युत पुरवठा करणाºया महावितरणच्या व्यवस्थेत बिघाड आल्याने ही समस्या निर्माण झालीे आहे.
जनरेटरमध्येही बिघाड
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला तीन वर्षांचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही विविध सोयी सुविधांचा अभाव आहे. येथे जनरेटरची व्यवस्था आहे. मात्र त्यामध्ये सुध्दा बिघाड आल्याची माहिती आहे. तर या जनरेटरची व्यवस्था शस्त्रक्रिया गृहाच्या दृष्टिकोनातून करण्यात आली नाही. तर एक दिवसांपूर्वीच जनरेटर बिघडल्याने त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र या सर्व प्रकाराने रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
आठवडाभरापासून एक्स-रे फिल्मचा तुटवडा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मागील आठवडाभरापासून एक्स-रे फिल्म नाहीत.त्यामुळे या विभागाचे कर्मचारी आठवडाभरापासून रिकामे बसले आहेत. दोन महिन्यांपूर्वी ५ हजार एक्स-रे फिल्म उपलब्ध करुन देण्यात आले होते मात्र त्या सुध्दा संपल्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दररोज शंभराहून अधिक रुग्णांचे एक्स-रे काढले जातात. मात्र आठवडाभरापासून एक्स-रे फिल्म नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयात जावून एक्स-रे काढावे लागत असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
केबल तुटल्याने समस्या
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अखंडित विद्युत पुरवठा करण्यासाठी एक्सप्रेस फीडरची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र एक्स्प्रेस फिडरमधून विद्युत पुरवठा होणारे केबल तुटल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्युत पुरवठा खंडित झाला असून त्यामुळे डॉक्टरांना मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात रुग्णांवर उपचार करावे लागत आहे.

Web Title: Patient check in light of mobile torch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.