रुग्णालयात दाखल होण्यासाठी रुग्णाचा रांगेत उभे असतानाच मृत्यू ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:28 AM2021-04-18T04:28:39+5:302021-04-18T04:28:39+5:30
गोंदिया : येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल होण्यासाठी आलेल्या एका कोरोनाबाधित युवकाचा रांगेत उभे असताना भोवळ येऊन मृत्यू ...
गोंदिया : येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल होण्यासाठी आलेल्या एका कोरोनाबाधित युवकाचा रांगेत उभे असताना भोवळ येऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि.१७) दुपारच्या सुमारास घडली. दरम्यान, या घटनेमुळे रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली होती. गौरीशंकर राऊत (३४) रा. कार्तुली, ता. आमगाव, असे मृत रुग्णाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार गौरीशंकर राऊत हा शनिवारी दुपारी २ वाजता येथील केटीएस रुग्णालयात दाखल होण्यासाठी आला होता. यासाठी तो बाह्यरुग्ण तपासणी विभागाच्या रांगेत लागला होता. याचदरम्यान त्याला भोवळ येऊन मृत्यू झाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नगरसेवक लोकेश यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार गौरीशंकर हा कोरोनाबाधित होता. तो केटीएसमधील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होण्यासाठी आला होता. त्याची प्रकृती गंभीर होती. तो दाखल होण्यासाठी रुग्णालयाच्या रांगेत लागला होता. मात्र, बराच वेळ रांगेत लागल्यानंतरही त्याचा नंबर आला नाही. याचदरम्यान त्याचा भोवळ येऊन मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकारानंतर रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, प्रकारासंदर्भात केटीएसच्या डॉक्टरांशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. रुग्णालये हाऊस फुल आहेत. ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. शासकीय रुग्णालयातसुद्धा रुग्णांचे हाल होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यातील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे चित्र आहे. अशात शनिवारी केटीएस रुग्णालयात दाखल होण्यासाठी आलेल्या रुग्णाचा रांगेत उभे असतानाच मृत्यूृ झाल्याने आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत.