सालेकसा तालुक्यात म्युकरमायकोसिसचा एक रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:21 AM2021-06-03T04:21:06+5:302021-06-03T04:21:06+5:30
सालेकसा (गोंदिया) : कोरोनातून बरे होणाऱ्यांना आता म्युकरमायकोसिस या आजाराचा धोका वाढला आहे. या आजाराचे जिल्ह्यात आतापर्यंत ३० रुग्ण ...
सालेकसा (गोंदिया) : कोरोनातून बरे होणाऱ्यांना आता म्युकरमायकोसिस या आजाराचा धोका वाढला आहे. या आजाराचे जिल्ह्यात आतापर्यंत ३० रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने सुध्दा आता सर्वेक्षण मोहीम सुरु केली आहे. सालेकसा तालुक्यात सर्वेक्षण मोहिमेदरम्यान बुधवारी (दि. २) म्युकरमायकोसिसचा १ रुग्ण आढळला असून तीन संशयित रुग्ण आढळले आहेत.
सालेकसा तालुक्यात एप्रिल २०२१ पर्यंत एकूण १४५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.? कोरोनामुक्त झाल्यानंतर मधुमेह व स्टेरॉईडचा अधिक वापर व आयसीयूमध्ये अधिक काळ राहिलेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) या आजाराचा धोका वाढला आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचे आरोग्य विभागाच्यावतीने सर्वेक्षण केले जात आहे. तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनात चारही प्राथमिक आरोग्य केंद्रांतील आरोग्य कर्मचारी, आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन तपासणी करीत आहेत.? १४५७ कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या घरी जाऊन आवश्यक तपासणी करण्यात आली. यामध्ये डोळे, तोंड, जीभ व चेहऱ्यावरील इतर अवयवांची तपासणी करण्यात आली. यादरम्यान तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी म्युकरमायकोसिसचा एक रुग्ण आढळला असून इतर तीन संशयित रुग्ण आढळले. म्युकरमायकोसिसच्या रुग्णाला त्वरित उपचारासाठी नागपूर येथे रेफर करण्यात आले. तर संशयित रुग्णांवर सध्या गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात येत आहे.
...........
जिल्ह्यात आतापर्यंत ३० रुग्णांची नोंद
गोंदिया जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे आतापर्यंत एकूण ३० रुग्ण आढळले आहेत. यापैकी काही रुग्णांवर नागपूर येथे उपचार सुरू आहेत. तर ११ रुग्णांवर गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.
कोट....
कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाला म्युकरमायकोसिस आजाराची लागण होत आहे. तालुक्यात १ रुग्ण आढळला असून त्याला नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे. तर तीन संशयित रुग्णांवर उपचार सुरु करण्यात आले आहे. म्युकरमायकोसिस सदृश आजाराची लक्षणे दिसताच त्वरित जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.
-डॉ. अमित खोडणकर, तालुका आरोग्य अधिकारी, सालेकसा