डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू ; संतप्त नातेवाइकांचा मृतदेह उचलण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 02:42 PM2024-08-24T14:42:39+5:302024-08-24T14:44:55+5:30

ग्रामीण रुग्णालयातील प्रकार : महिला डॉक्टर व अधिपरिचारिकेवर कारवाईची मागणी

Patient's death due to doctor's negligence; Refusal to pick up the body of angry relatives | डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू ; संतप्त नातेवाइकांचा मृतदेह उचलण्यास नकार

Patient's death due to doctor's negligence; Refusal to pick up the body of angry relatives

लोकमत न्यूज नेटवर्क 
देवरी:
डॉक्टर व अधिपरिचारिकांच्या हलगर्जीपणामुळे योग्य उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू झाल्याचा प्रकार येथील ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी (दि.२३) सकाळी १० वाजता दरम्यान घडला. या प्रकारामुळे मात्र संतप्त नातेवाइकांनी मृतदेह उचलण्यास नकार दिला. तब्बल पाच तास चाललेल्या या गोंधळानंतर अखेर संबंधित डॉक्टर व अधिपरिचारिकांना कार्यमुक्त करण्यात आल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह उचलला. मात्र डॉक्टर व अधिपरिचारिकांवर कारवाई करण्याची मागणी नातेवाइकांनी केली आहे. मृत रुग्णाचे नाव देवराम नारायण गावड (६०, रा. पालांदूर) असे आहे. 


तालुक्यातील ग्राम पालांदूर येथील रहिवासी देवराम गावड यांना गुरुवारी (दि.२२) रात्री झोपेत असताना अज्ञात किटकाने कानाला चावा घेतला. यानंतर शुक्रवारी (दि.२३) सकाळी त्यांना अस्वस्थ वाटून श्वास घ्यायला त्रास होत असल्याने नातेवाइकांनी त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात सकाळी ७ वाजता भरती केले. त्यावेळी डॉक्टर उर्वशी येडे यांची ड्यूटी असूनही त्या रुग्णालयात हजर नव्हत्या. यावर कार्यरत अधिपरिचारिका विजेता उके व आकांशा कुमार यांच्यातील एकीने देवराम यांना एक इंजेक्शन लावले. काही वेळाने डॉ. येडे रुग्णालयात आल्या व त्यानंतरही पाहिजे त्या पद्धतीने देवराम यांच्यावर उपचार होत नसल्याने त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. यामुळे नातेवाइकांनी त्यांना रेफर करण्याची विनंती केली. परंतु डॉ उर्वशी येडे यांनी दुर्लक्ष केले. तीन तास देवराम यांना आवश्यक उपचार मिळाले नाही व त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याने संतप्त नातेवाइकांनी आरडाओरड करून उपचार करण्यास डॉक्टरांना सांगितले तरीसुद्धा डॉक्टरांनी त्याकडे लक्ष दिले नाही असा आरोप देवराम यांच्या नातेवाइकांनी केला आहे. अखेर १० वाजता दुसऱ्या शिफ्टला ड्यूटीवर कार्यरत डॉक्टरांनी देवराम यांच्यावर उपचार सुरू केले. परंतु काही मिनिटांतच देवराम यांचा मृत्यू झाला.


देवराम यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या डॉ. येडे व कार्यरत अधिपरिचारिका उके आणि कुमार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी संतप्त नातेवाइकांनी केली. तसेच जोपर्यंत दोषीवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेहावर उत्तरीय तपासणी होऊ देणार नाही अशी कठोर भूमिका नातेवाईक व सामाजिक कार्यकर्ते कुलदीप लांजेवार, विलास शिंदे व राजेश चांदेवार यांनी घेतली. विशेष म्हणजे, रुग्णालयात जबाबदार असलेले वैद्यकीय अधीक्षक गगन गुप्ता हेसुद्धा हजर नसल्याने त्यांच्यावरसुद्धा कारवाईची मागणी नातेवाइकांनी केली. या घटनेमुळे सुमारे ५ तास ग्रामीण रुग्णालयात तणावाचे वातावरण होते व शेवटी दुपारी ३ वाजता डॉ. येडे तसेच अधिपरिचारिका उके व कुमार यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश वैद्यकीय अधीक्षक गुप्ता यांनी मेलवर पाठविले. पन्नाची प्रत हातात घेतल्यावरच नातेवाइकांनी उत्तरीय तपासणीस होकार दिला.


घडलेल्या प्रकाराला घेऊन वैद्यकीय अधीक्षक गुप्ता यांना दूरध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही. तर डॉ. येडे ड्यूटी संपल्यावर गोंदिया येथे घरी गेल्याची माहिती मिळाल्याने त्यांच्याशी फोनवर संपर्क केला असता फोन संपर्क क्षेत्राच्या बाहेर होता. 


रुग्णालयात रुग्णसेवा वाऱ्यावर 
एक वर्षापूर्वी येथील रुग्णालयाच्या भव्य इमारतीचे लोकार्पण करण्यात आले त्यावेळी पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी रुग्णालयात रुग्णांना योग्य ती रुग्णसेवा मिळेल असे आश्वस्त केले होते. परंतु स्थिती विपरीत असून ग्रामीण भागातील आदिवासी गरीब नागरिकांना येथे योग्य उपचार मिळत नसल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागत आहे. डॉक्टर मुख्यालयी हजर राहत नसल्याने रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. तक्रार करूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. दोन दिवसांपूर्वीच रुग्णालयात एका इसमाने आपल्या मित्रावर उपचार होत नसल्याने डॉक्टरास धमकावले असून डॉक्टरांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आता डॉक्टरांच्या व तेथील कर्मचाऱ्यांच्या लापरवाहीमुळे एका गरीब रुग्णाचा मृत्यू झाला. आता या डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये? असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे.


"वडिलांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने मी सकाळी ७ वाजता ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी महिला डॉक्टर रुग्णालयात नव्हत्या व अधिपरिचारिकांनी त्यांना इंजेक्शन लावले. माझे बाबा त्यावेळेस बोलत होते मात्र काही वेळाने त्यांची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांना सांगून त्यांना रेफर करण्याची विनंती करूनसुद्धा त्यांनी दुर्लक्ष केले. वडिलांना योग्य उपचार मिळाला नाही व शेवटी १० वाजता दुसन्या डॉक्टरांनी उपचार सुरू केले तोपर्यंत माझ्या वडिलांचा मृत्यू आला होता. माझ्या वडिलांच्या मृत्यूला जबाबदार महिला डॉक्टर व अधिपरिचारिका तसेच वैद्यकीय अधीक्षकांवर कार्यवाही करून आम्हाला न्याय द्यावा."
- कृष्णा देवराम गावड, मुलगा


"देवरी ग्रामीण रुग्णालयात रुग्णाला योग्य उपचार न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची तक्रार आम्हाला प्राप्त झाली आहे. त्या अनुषंगाने सिव्हिल सर्जन यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. चौकशी होईपर्यंत कार्यरत महिला डॉक्टर व अधिपरिचारिकांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. चौकशीमध्ये ते दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल." 
- कांचन वानरे, आरोग्य उपसंचालिका नागपूर.

Web Title: Patient's death due to doctor's negligence; Refusal to pick up the body of angry relatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.