रिलायन्स हॉस्पिटलने थांबणार रुग्णांची पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 10:34 PM2018-11-29T22:34:26+5:302018-11-29T22:35:00+5:30
तोंडाचा तसेच इतर कर्करोगाच्या रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा गोंदिया येथे नसल्यामुळे येथील रुग्णांना नागपूर, मुंबई अथवा हैद्राबाद येथे गेल्याशिवाय पर्याय नव्हता. यासाठी रुग्णांना मानसिक त्रास तसेच आर्थिक भुर्दंड सुध्दा बसत होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तोंडाचा तसेच इतर कर्करोगाच्या रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा गोंदिया येथे नसल्यामुळे येथील रुग्णांना नागपूर, मुंबई अथवा हैद्राबाद येथे गेल्याशिवाय पर्याय नव्हता. यासाठी रुग्णांना मानसिक त्रास तसेच आर्थिक भुर्दंड सुध्दा बसत होता. ही पायपीट दूर करण्यासाठी खा. प्रफुल्ल पटेल यांनी पुढाकार घेतला.
रिलायन्स समूहाच्या टिना अंबानी यांनी डॉॅ. नितू मांडके यांच्या स्मृती प्रित्यर्थ मांडके फांऊडेशनची स्थापना केली आहे. या फांऊडेशन अंतर्गंत देशभरात ६ हजार ६६० कॅन्सर हॉस्पिटल स्थापन करण्यात येणार आहे. त्यापैकी ३ महाराष्ट्रात सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये गोंदिया, अकोला व सोलापूरचा जिल्ह्याचा समावेश आहे. खा. प्रफुल्ल पटेल, वर्षा पटेल यांचे अंबानी यांच्याशी कौटुंबिक संबंध आहेत. त्यांच्याच आग्रहावरुन अंबानी समुहाने गोंदिया येथे कॅन्सर हॉस्पिटल सुरु करण्याचा निर्णय घेतला.
गोंदिया-गोरेगाव मार्गावरील कारंजाजवळ रियालायन्स कॅन्सर हॉस्पिटलची इमारत तयार झाली आहे. त्यात कॅन्सरवरील उपचाराची सर्व आधुनिक यंत्रसामुग्री सुध्दा सज्ज आहे. या रूग्णालयात केमोथेरपी, मुख कर्करोग तसेच कॅन्सरच्या इतर आजारांवर तज्ञ डॉक्टरांकडून उपचार केले जाणार आहे. हे हॉस्पीटल कोकिळाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल मुंबईशी इंटरनेटव्दारे संलग्न असून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सुध्दा रुग्णांवर उपचार केले जाणार आहे.
आठवड्यातील ठरावीक दिवशी मुंबई येथील डॉक्टर येथील रुग्णालयात उपलब्ध राहणार आहेत. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यासह मध्यप्रदेश व छत्तीसगडच्या रुग्णांना सुध्दा या हॉस्पीटलची मदत होणार असल्याचे या हॉस्पीटलच्या मुख्य प्रशासकीय अधिकरी निकिता सक्सेना यांनी सांगितले. मनोहरभाई पटेल अॅकेडमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल यांनी बुधवारी (दि.२८) या हॉस्पीटलला भेट देऊन हॉस्पीटलच्या सोयी सुविधांचा आढावा घेतला. या हॉस्पीटलमुळे जिल्ह्यातील रुग्णांना दर्जेदार आरोग्याची सुविधा मिळणार असून त्यांना नागपूर, मुंबईपर्यंत पायपीट सुध्दा करावी लागणार नसल्याचे सांगितले. या वेळी माजी आ.राजेंद्र जैन, डॉ.देवाशिष चॅटर्जी, डॉ.दीपक बहेकार, डॉ. विकास जैन, डॉ.पुष्पराज गिरी, डॉ.अभिषेक भोलोटिया, डॉ.अमित जयस्वाल उपस्थित होते.