पाण्यासाठी रुग्णांची भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 10:45 PM2018-01-10T22:45:57+5:302018-01-10T22:46:23+5:30
येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील (बीजीडब्ल्यू) बोअरवेल मागील दोन तीन दिवसांपासून बंद असल्याने रुग्णांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील (बीजीडब्ल्यू) बोअरवेल मागील दोन तीन दिवसांपासून बंद असल्याने रुग्णांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मात्र रुग्णालय प्रशासनाने अद्यापही समस्या मार्गी लावली नसल्याने रुग्णांची समस्या कायम आहे.
यापूर्वी सुध्दा बीजीडब्ल्यू रुग्णालयातील बोअरवेल बंद असल्याने रुग्णांना आठ ते दहा दिवस पिण्याचे पाणी दूरवरुन आणावे लागते होते. यामुळे रुग्णांचे हाल झाले होते. रुग्णांची ओरड वाढल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तात्पुरती व्यवस्था केली होती. मात्र मागील दोन दिवसांपासून पुन्हा पाण्यासाठी रुग्णांना भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. प्राप्त माहितीनुसार बीजीडब्ल्यू रुग्णालयाला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन लिकेज झाल्याने येथील पाणी पुरवठा बंद आहे. तर रुग्णालयातील दोन्ही बोअरवेल बंद असून त्यांची अद्यापही दुरूस्ती करण्यात आली नाही. परिणामी रुग्णांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे.
जिल्ह्यातील एकमेव शासकीय महिला रुग्णालय असल्याने येथे दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येथे येतात.आधीच रुग्णांच्या नातेवार्इंकांची उपचारासाठी धावपळ सुरू असताना आता मात्र त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या रुग्णालयाच्या परिसरात मागील काही दिवसांपासून रक्तपेढीच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे.
रुग्णालयात आधीच पाण्याची समस्या असताना बांधकामासाठी येथील बोअरवेलच्या पाण्याचा वापर करण्यात आल्याची माहिती आहे. बांधकामासाठी बोअरवेलच्या पाण्याचा वापर केल्याने मोटार बिघडल्याचे बोलल्या जाते. मागील दोन दिवसांपासून रुग्णांची पाण्यासाठी भटकंती सुरू असताना मात्र रुग्णालय प्रशासनाने केवळ थातुर मातुर उपाय योजना करुन याकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबिल्याने रुग्णांचे हाल होत आहे.
रुग्णांचे आरोग्य धोक्यात
जिल्ह्यातील दुर्गम भागातील रुग्ण येथील बीजीडब्ल्यू रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येतात. गर्भवती महिला आणि लहान बालकांचा सुध्दा समावेश आहे. मात्र रुग्णालयात पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना बाहेरुन पाणी आणावे लागत आहे. हे पाणीे पिण्यायोग्य आहे किंवा नाही, याची सुध्दा खात्री नसून रुग्ण तेच पाणी पित असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र आहे.
दुसऱ्यांचा घडला प्रकार
बीजीडब्ल्यू रुग्णालयात पिण्याचा पाण्याचा पुरवठा करणारी बोअरवेल तीन महिन्यापूर्वी सुध्दा बिघडली झाली होती. तेव्हा सुध्दा बोअरवेल दुरूस्तीसाठी आठ दिवस लागले होते. आता पुन्हा तिच समस्या निर्माण झाली असून ती मार्गी लावण्याकडे रुग्णालय प्रशासनाचे पुर्णत: दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे.
रुग्णालयातील बोअरवेल दुरूस्तीचे आदेश दिले आहे. लवकरच दुरूस्तीचे काम पूर्ण करण्यात येईल यानंतर पाण्याची समस्या राहणार नाही.
- डॉ.प्रदीप कांबळे,
प्रभारी वैद्यकीय अधीक्षक बीजीडब्ल्यू.