ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला विराम ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:22 AM2021-06-02T04:22:24+5:302021-06-02T04:22:24+5:30
आमगाव : येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राची रब्बी हंगामाकरिता धान खरेदीसाठी असलेली नोंदणी प्रक्रियेची मुदत संपली आहे. अद्याप ...
आमगाव : येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राची रब्बी हंगामाकरिता धान खरेदीसाठी असलेली नोंदणी प्रक्रियेची मुदत संपली आहे. अद्याप हजारो शेतकऱ्यांची नोंदणी झालेली नाही. परिणामी, हे शेतकरी शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विक्री करण्यापासून वंचित राहणार आहे.
तालुक्यात रब्बी पिकांचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी उसनवार घेऊन मेहनत घेतली. रब्बी हंगामात उत्पादनात भर पडली म्हणून शेतकऱ्यांना शासकीय आधारभूत केंद्रातून दिलासा मिळणार असे वाटत होते, पण तहसील कार्यालयात सांजे भरपूर, मात्र तलाठ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे वेळेवर सात-बारा व नमुना-८ न मिळाल्याने शेतकरी शासनाने दिलेल्या ऑनलाईन नोंदणीसाठी हजर राहू शकले नाहीत. परिणामी, तालुक्यातील हजारो शेतकरी धान विक्रीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. अशात नोंदणीकरिता मुदत वाढवून देण्याची मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश भक्तवर्ती, उपसरपंच महेंद्र रहांगडाले व विजय बहेकार यांनी केली आहे.
.........
खरेदी-विक्री सोसायटीत धान खरेदी केव्हा होणार
आमगाव तालुक्यात अन्य संस्थांच्या धान खरेदी केंद्राचे उद्घाटन होऊन धान खरेदी सुरू झाली आहे, पण खरेदी-विक्री सोसायटीअंतर्गत अद्याप रब्बी धानाची खरेदी सुरू करण्यात आली नसल्याने ऑनलाईन केलेल्या शेतकऱ्यांची पंचाईत होत आहे. बहुतेक शेतकरी खासगी व्यापाऱ्यांकडे १२०० ते १३०० रुपयांपर्यंतच्या किमतीत धान विक्री करीत असल्याची माहिती आहे. संचालक मंडळ व अधिकाऱ्यांनी गोदाम उपलब्ध करून धान खरेदी करण्यासाठी योग्य पाऊल उचलावे, जेणेकरून आधारभूत केंद्रातील सोईंचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल.