पवारांच्या पूर्व विदर्भ दौऱ्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 10:10 PM2018-12-31T22:10:27+5:302018-12-31T22:10:50+5:30
नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या धान उत्पादक शेतकºयांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा पूर्व विदर्भातील दौरा उर्जा देऊन गेला. रिलायंस उद्योग समूहाच्या कॅन्सर रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी गेल्या आठवड्यात गोंदिया येथे आले असता शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर त्यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले.
अंकुश गुंडावार।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या धान उत्पादक शेतकºयांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा पूर्व विदर्भातील दौरा उर्जा देऊन गेला. रिलायंस उद्योग समूहाच्या कॅन्सर रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी गेल्या आठवड्यात गोंदिया येथे आले असता शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर त्यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताच छत्तीसगढप्रमाणे राज्यातही धानाला २५०० रुपये हमीभाव देऊ, अशी ग्वाही दिली. शरद पवारांच्या या खेळीने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली तर शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मागील आठवड्यात गोंदिया जिल्ह्याच्या दौºयावर आले होते. रिलायन्स उद्योग समूहाच्या कॅन्सर हॉस्पिटलचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. निमित्त कोणतेही असले तरी शरद पवार यांच्या डोळ्यापुढे शेतकरी कायम असतो.त्यामुळेच त्यांनी कॅन्सर हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळ्यानंतर पत्रकारांशी वार्तालाप करताना शेतकºयांच्या जीव्हाळ्याच्या विषयावर महत्वपूर्ण वक्तव्य केले. आमचे सरकार आले तर धानाला २५०० रूपये हमी भाव देवू, असे सांगितले. धानाच्या हमीभावासोबतच कापूस आणि सोयाबीनसाठीसुद्धा महत्वपूर्ण निर्णय घेतले जातील, असे सांगितले. शरद पवार हे अनुभवी नेते आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे कृषीमंत्री म्हणून बजावलेली भूमिका सर्वविधीत आहे. त्यामुळेच शरद पवारांची ही घोषणा नक्कीच साधी नसावी. त्यांना शेतकऱ्यांना खूशच करायचे असते तर छत्तीसगडपेक्षा अधिक रक्कमेची ग्वाहीही देता आली असती. मात्र त्यांनी प्रत्यक्ष जेवढे समर्थन मूल्य देता येईल तेवढ्याच रक्कमेची ग्वाही दिली.आम्ही निश्चितच २५०० रूपये धानाला समर्थनमूल्य देवू शकतो. असा संदेश शरद पवारांना द्यायचा होता.
शरद पवारांनी दिलेली २५०० रूपये हमीभावाची ग्वाही हवेत विरणारी नाही, हे या भागातील शेतकरी जाणून आहेत. विशेष म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीनंतर लगतच्या छत्तीसगड सरकारने शपथ ग्रहण करताच धानाला २५०० रूपये हमी भावाची घोषणा केली. छत्तीसगड सरकार करू शकते तर महाराष्ट्र सरकार का करू शकत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आमचे सरकार आले तर छत्तीसगडप्रमाणे समर्थन मूल्य देण्याची ग्वाही दिली. पवारांच्या या राजकीय खेळीने विदर्भाच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. राजकीय इच्छाशक्ती आणि प्रभावाचा वापर करून एखादा प्रश्न कसा मार्गी लावता येवू शकते हे प्रफुल्ल पटेल यांनी धान उत्पादकांच्या प्रश्नातून सिद्ध करून दाखविले. गोंदिया जिल्ह्यात सुरू झालेले कॅन्सर हॉस्पिटल ही प्रफुल्ल पटेल यांचीच देणगी होय. अंबानी परिवाराशी असलेल्या कौटुंबिक सलोख्यामुळेच या जिल्ह्याला एवढेमोठे कॅन्सर रुग्णालय मिळाले.
पवारांच्या वक्तव्याने हालचालींना वेग
शरद पवार यांनी आमचे सरकार सत्तेवर आल्यास लगतच्या छत्तीसगड प्रमाणेच धानाला प्रती क्विंटल २५०० रुपये हमीभाव देऊ अशी घोषणा केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्य सरकार खळबळून जागे झाले आहे.धान उत्पादकांसाठी आपण काही करू शकतो का याची चाचपणी करू लागले आहे. एकंदरीत शरद पवारांचा पूर्व विदर्भाचा दौरा धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी आशा पल्लवीत करणारा तर सत्ताधारी पक्षासाठी निवडणुकीच्या तोंडावर वादळ निर्माण करणारा ठरला.
शेतकऱ्यांसाठी प्रफुल्ल पटेल यांचा पुढाकार
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी या दौऱ्याच्या निमित्ताने शरद पवार यांच्यापुढे पूर्व विदर्भातील धान उत्पादकांच्या व्यथा मांडल्या. मागील दोन तीन वर्षांपासून शेतकरी दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाचा सामना करीत आहे. तसेच विद्यमान सरकारने मागील चार वर्षांत शेतकºयांची कशी पिळवणूक केली. चार वर्षांत हमीभावात केवळ दोनश रुपयांची वाढ करुन शेतकऱ्यांच्या जखमेवर कसे मीठ चोळले ही बाब निदर्शनास आणून दिली. तसेच वर्तमान परिस्थितीत धानाला १६०० ते १७०० रूपये हमी भाव दिला जातो. त्यात धान उत्पादकांची पिळवणूक होत असल्याचे लक्षात आणून दिले.
शिष्टमंडळानेही वेधले लक्ष
गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादकांच्या समस्यां संदर्भात खा. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात खासदार मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी आमदार राजेंद्र जैन,दिलीप बनसोड, अनिल बावनकर, भंडारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, धनंजय दलाल व पदाधिकाºयांनी एक निवेदन शरद पवार यांना दिले.