घरकुलाच्या मजुरीची थकीत रक्कम त्वरित द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:30 AM2021-04-02T04:30:54+5:302021-04-02T04:30:54+5:30
गोंदिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत प्रत्येकाच्या स्वप्नातील घराचे स्वप्न साकारण्याचे आश्वासन दिले आहे. याअंतर्गत विविध योजनांतर्गत ...
गोंदिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत प्रत्येकाच्या स्वप्नातील घराचे स्वप्न साकारण्याचे आश्वासन दिले आहे. याअंतर्गत विविध योजनांतर्गत घरकुलांना मंजुरी दिली जात आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी १ लाख ३० हजार रुपये लाभार्थ्यांना चार हप्त्यांमध्ये दिले जात आहेत. या कामावर असलेल्या रोजगार हमी योजनेच्या मजुरांनासुद्धा १८ हजार रुपयांची रक्कम थकीत त्वरित देण्याचे निर्देश राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.
गोंदिया पंचायत समितीअंतर्गत जवळपास १४ हजार घरकुलांचे काम सुरू आहे. यापैकी अनेक लाभार्थ्यांना बांधकाम साहित्यासाठी दोन हप्ते मिळाले आहेत. मात्र, मजुरांना अद्यापही त्यांची मजुरी मिळाली नव्हती. त्यामुळे मजूरवर्ग अडचणीत आला होता. ही समस्या मुंडीपारचे माजी उपसरपंच विठ्ठल करंडे, अशोक मेंढे, केशव तावाडे, चेतन नागपुरे, रवी तरोणे, अशोक गोखले, प्रकाश तांडेकर, कोमल धोटे, रुद्रसेन खांडेकर, अर्जुन नागपुरे यांनी व घरकुुुल लाभार्थ्यांनी माजी आ. गोपालदास अग्रवाल यांच्या निदर्शनास आणून दिली होती. तिची दखल घेत गोपालदास अग्रवाल यांनी राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी या विषयावर दूरध्वनीवरून चर्चा केली. याचीच दखल घेत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी मजुरांना मजुरीची थकीत रक्कम त्वरित देण्याचे निर्देश रोजगार हमी योजनेच्या अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे मजुरांना त्यांची मजुरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, त्यांनी माजी आ. गोपालदास अग्रवाल यांचे आभार मानले आहेत.