बोनसची थकीत रक्कम त्वरित द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:32 AM2021-08-28T04:32:09+5:302021-08-28T04:32:09+5:30
परसवाडा : मागील खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना अद्यापही बोनसची ५० टक्के रक्कम मिळाली ...
परसवाडा : मागील खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना अद्यापही बोनसची ५० टक्के रक्कम मिळाली नाही. आठ महिन्यांपासून शेतकरी बोनसच्या रकमेसाठी बँका आणि धान खरेदी केंद्राच्या पायऱ्या झिजवीत आहेत; पण अद्यापही शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.
जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या नियोजनशून्य कारभारामुळे खरीप आणि रबी हंगामातील धान खरेदीत प्रचंड गोंधळ उडाला. खरेदी केलेल्या धानाची उचल वेळेत न झाल्याने व गोदामांची समस्या निर्माण झाल्याने शाळांचा गोदाम म्हणून वापर करण्याची वेळ या विभागावर आली आहे. अजूनही लाखो क्विंटल धान गोदामांमध्ये तसेच पडले आहे, तर चुकारे आणि बोनसची अर्धी रक्कम अजूनही मिळाली नाही. परिणामी, शेतकऱ्यांना सावकारांच्या दारात उभे राहून खरिपातील रोवणी आणि इतर कामे करावी लागत आहेत, तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण सण असलेला पोळा आठ ते दहा दिवसांवर असून, बोनसचे पैसे न मिळाल्याने हा सणसुद्धा त्यांना अंधारात साजरा करण्याची वेळ आली आहे, तर शेतीचा खर्च करण्यासाठीसुद्धा दुसऱ्याकडे हात पसरावे लागत आहेत. त्यामुळे बोनस आणि चुकाऱ्यांची थकीत रक्कम त्वरित देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.