बोनसची उर्वरित रक्कम त्वरित द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:19 AM2021-07-19T04:19:26+5:302021-07-19T04:19:26+5:30
सालेकसा : शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपये प्रती क्विंटल बोनस देण्याचे जाहीर केले. परंतु, बोनसची अर्धीच रक्कम ...
सालेकसा : शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपये प्रती क्विंटल बोनस देण्याचे जाहीर केले. परंतु, बोनसची अर्धीच रक्कम दिली आहे. तरी शासनाने घोषणेप्रमाणे ७०० रुपयांप्रमाणे बोनसची पूर्ण रक्कम शेतकऱ्यांना देऊन आपले कर्तव्य पार पाडावे, अशी मागणी करणारे तालुका भारतीय जनता पक्षाने केली आहे. यासाठी भाजपच्यावतीने तहसीलदार अरुण भुरे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
निवेदनात, एक तर धानावरील मिळणारी बोनसची रक्कम तीन महिन्यांपूर्वी मिळणे गरजेचे असतानाही त्यावेळी दिली नाही. शेतकऱ्यांच्या सतत मागणीवरून राज्य शासनाने बोनसची रक्कम मंजूर केली; परंतु ७०० ऐवजी ३५० रुपये प्रती क्विंटलप्रमाणेच दिली. हा शेतकऱ्यांसोबत मोठा विश्वासघात केला आहे. जर सरकारला आपल्या बोलण्यावर कायम राहायचे असेल पूर्ण ७०० रुपयांप्रमाणे मंजूर करावे, अन्यथा जनतेचा विश्वास राहणार नाही. तसेच शेतकऱ्यांना कृषी विभाग आणि जि. प. मार्फत मिळणारे शेतीसंबंधी औजार व बियाणे यांच्यावरील अनुदानसुद्धा बंद करण्यात आले आहे. कोविड काळात त्रस्त असलेल्या शेतकऱ्याला राज्य शासन जास्त अडचणीत टाकण्याचे काम करीत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल असून, त्यांना तातडीने विविध प्रकारच्या साहित्यांसाठी अनुदान व बोनसची पूर्ण रक्कम देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना भाजप तालुकाध्यक्ष गुणवंत बिसेन, बाबा लिल्हारे, राजू येटरे, आर. डी. रहांगडाले, आदी उपस्थित होते.