खरीप हंगामातील बोनसचा दुसरा हप्ता त्वरित द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:31 AM2021-08-26T04:31:23+5:302021-08-26T04:31:23+5:30
मुंडीकोटा : मागील खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ७०० रुपये बोनस जाहीर करण्यात ...
मुंडीकोटा : मागील खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ७०० रुपये बोनस जाहीर करण्यात आला. यापैकी बोनसची ५० टक्के रक्कम महिनाभरापूर्वीच देण्यात आली. मात्र उर्वरित ५० टक्के रक्कम अजूनही शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.
खरीप हंगाम सन २०२०-२१ मधील धान शेतकऱ्यांनी शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री केले. याला जवळपास आठ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. शासनाने प्रतिक्विंटल ७०० रुपयांप्रमाणे बोनस मंजूर केले. बोनसची ५० टक्के रक्कम शेतकऱ्यांना दिली. उर्वरित दुसऱ्या हप्त्याची रक्कम एक महिन्याच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल, असे शासनाने आश्वासन दिले होते. परंतु अजूनही शेतकऱ्यांना बोनसचा दुसरा हप्ता मिळालेला नाही. सध्या खरीप हंगाम सुरू असून, शेतकऱ्यांना खते व मजुरीचा खर्च कुठून करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकरीवर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. पंधरा दिवसांपूर्वी खासदार प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोनसचा दुसरा हप्ता त्वरित मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अजूनही बोनसचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शासनाने जमा केलेला नाही. तरी त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.