सहा दिवसांत प्रवाशांना ३.५१ लाखांचा दंड
By admin | Published: August 10, 2016 12:07 AM2016-08-10T00:07:07+5:302016-08-10T00:07:07+5:30
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळाचे मंडळ रेल्वे व्यवस्थापक अमितकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात मंडळातून
गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळाचे मंडळ रेल्वे व्यवस्थापक अमितकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात मंडळातून ये-जा करणाऱ्या गाड्या तथा लहान-मोठ्या स्थानकांवर वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक अर्जुन सिब्बल यांच्या नेतृत्वात सहायक वाणिज्य व्यवस्थापक ओ.पी. जायस्वाल, तिकीट निरीक्षक, वाणिज्य निरीक्षक व रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी १ ते ६ आॅगस्टपर्यंत विशेष तिकीट तपासणी अभियान राबविले. यात विनातिकीट प्रवास करणारे व विनामाल बुक केलेल्या लगेजचे एक हजार ६४० प्रकरण उघडकीस आणण्यात आले. त्यांच्याकडून तीन लाख ५१ हजार ८३० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय केरकचरा पसरविण्याच्या नऊ प्रकरणांत संबंधितांकडून जवळपास ७५० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.
या अभियानांतर्गत रेल्वे मजिस्ट्रेटच्या वतीने घेण्यात आलेल्या कॅम्प कोर्टात १४२ जणांविरूद्ध विविध कलमांतर्गत कारवाई करून ६१ हजार ३०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. उल्लेखनिय म्हणजे ४ आॅगस्ट रोजी तुमसर रेल्वे स्थानकावर किलेबंदी तपासणीदरम्यान केवळ एकाच दिवसात विनातिकीट प्रवास करणाऱ्या व विना माल बुक केलेल्या लगेजसह प्रवास करण्याबाबतचे ५२७ प्रकरण समोर आले. यात संबंधितांकडून जवळपास एक लाख २५ हजार ४५५ रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. (प्रतिनिधी)