कचारगड-धनेगावात उसळला भाविकांचा जनसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 12:40 AM2018-02-01T00:40:00+5:302018-02-01T00:40:21+5:30

आदिवासी समाजबांधवाचे श्रद्धास्थान असलेले कचारगड येथे कोया पुनेम महोत्सवानिमित्त बडादेव पूजेत सहभागी होण्यासाठी बुधवारी (दि.३१) माघ पौर्णिमेचे औचित्य साधून देशाच्या कानाकोपऱ्यातून आदिवासी भाविक धनेगाव येथे दाखल झाले होते.

People from Kachargad-Dhanegaon, | कचारगड-धनेगावात उसळला भाविकांचा जनसागर

कचारगड-धनेगावात उसळला भाविकांचा जनसागर

Next
ठळक मुद्देविविध राज्यातील आदिवासी समाजबांधव धनेगावात : जय जंगो जय लिंगो व जय सेवेच्या गजरात कोया पुनेम महोत्सवाला सुरूवात

विजय मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंडी धर्मभूमि कचारगड : आदिवासी समाजबांधवाचे श्रद्धास्थान असलेले कचारगड येथे कोया पुनेम महोत्सवानिमित्त बडादेव पूजेत सहभागी होण्यासाठी बुधवारी (दि.३१) माघ पौर्णिमेचे औचित्य साधून देशाच्या कानाकोपऱ्यातून आदिवासी भाविक धनेगाव येथे दाखल झाले होते. त्यामुळे धनेगाव ते कचारगड संपूर्ण परिसर पिवळ्या रंगात रंगल्याचे चित्र होते.
बुधवारी माघ पौर्णिमे निमित्त गोंडी भूमकाल (पुजारी) यांनी सकाळी महापूजेला सुरुवात केली. या पूजेत आदिवासी समाजाचे सर्व प्रकारचे गोंडी धर्माचार्य, विद्वान, वरिष्ठ धर्मप्रचारक, साहित्यकार, राजकारणी, उच्च पदस्थ, अधिकारी-कर्मचारी यांच्यासह लाखोंच्या संख्येत विविध राज्यातील भाविक सहभागी झाले. भूमकाल यांनी बडादेव पूजा केल्यानंतर गोंड राजे वासुदेव शहा टेकाम यांनी गोंडी धर्माचे सप्तरंगी ध्वज फडकावले. यावेळी आदिवासी भाविकांच्या जय घोषाने धनेगाव ते दरेकसाचा परिसर दुमदुमुन गेला होता. त्यानंतर आमदार संजय पुराम यांच्या हस्ते गोंडवाना साम्राज्याचा झेंडा फडकाविण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवित गोंडी धर्माचार्य दादा हिरासिंह मरकाम यांनी ध्वज पूजन करीत ७५० गणगोत यांची पूजा केली. त्यानंतर सर्व आदिवासी मान्यवर आणि भाविकांनी एकामेकाला पिवळ्या रंगाचा हळदीचा टिका लावून एकमेकाला आलींगन दिले. यावेळी संपूर्ण धनेगावचे प्रांगण धार्मिक वातावरणात रंगले होते.
दुपारी १२ वाजता महा गोंगोबा कोया पुनेमी महासंमेलनाला सुरुवात झाली.
या कोयापुनेमी महोत्सवाचे उद्घाटन राष्टÑीय जनजाती आयोग नवी दिल्ली येथील सदस्या माया इनवाते यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली चिमूर क्षेत्राचे खा. अशोक नेते होते. माजी केंद्रीय मंत्री व मंडळाचे खा. फग्गनसिंह कुलस्ते, काकेर (छ.ग)चे खा. विक्रम उसेंडी, आयुक्त डॉ. किशोर कुंभरे, डॉ. नरेंद्र कोडवते उपस्थित होते. स्वागताध्यक्ष म्हणून पुराम यांनी कार्यक्रमाची यजमान करण्याची जबाबदारी सांभाळली.
१८ राज्यातील भाविकांची उपस्थिती
कचारगड यात्रेत जवळपास १८ राज्यातील भाविक मोठ्या संख्येने दाखल होतात. महाराष्ट्र, छत्तीसगड, ओरिसा, झारखंड, बिहार, पं. बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागालँड, मणिपूर, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश या राज्यातील आदिवासी समाजबांधव येथे दरवर्षी येतात. दिल्ली, गुजरात, कनार्टक, गोवा राज्यातील भाविक सुध्दा येथे येतात. त्यामुळे येथे भाविकांची एकच गर्दी दिसून येत असते. १९८४ मध्ये कचारगड यात्रेची सुरुवात करणारे मोतीरावण कंगाली आणि के.बा.मरस्कोल्हे यांच्या पुतळ्याचे बुधवारी अनावरण करण्यात आले.
कचारगड जंगलात आग लागल्याने तारांबळ
कचारगड यात्रेनिमित्त धनेगाव परिसरात महापूजा व झेंडावंदन कार्यक्रम सुरू असताना गुफा परिसरात पहाडालगत जंगलात आग लागल्याची माहिती मिळताच या परिसरात एकच तारांबळ उडाली. परंतु तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करून आग आटोक्यात आणण्यात आली. गोंदिया व तिरोडा अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते.
गोंडी संस्कृतीचे दर्शन
भूमकाल यांच्या धनेगाव येथील पूजेनंतर शंभूसेकची पालखी कचारगड देवस्थानकडे गेली व कचारगड गुफा जावून मॉ काली कंकाली, माता जंगो, बाबा लिंगो यांची पूजा केली. या पालखी सोबत विविध मान्यवर व गोंडी धर्माचार्य सहभागी झाले. पालखी व महापूजा करताना आदिवासी समाजाच्या लोकांचे विविध वाद्य वादन व सनई वादन होताना दिसले. तसेच गोंडी वेश, गोंडी बाणा व शस्त्र शास्त्र आदिचे दर्शन सुद्धा पालखी यात्रेत दिसून आले.
महारॅलीत विविध मान्यवरांचा सहभाग
महापुजेच्या कार्यक्रमात व पालखी यात्रेत गोंडी धर्म प्रचारक शीतल मरकाम यांच्या विशेष उपस्थितीत छत्तीसगड येथील गोंडी आचार्य शेरसिंह आचला यांच्या हस्ते महारॅलीचा शुभारंभ करण्यात आला. या महारॅलीमध्ये आदिवासी फेडरेशनचे केंद्रीय अध्यक्ष मधुकर उईके, पिपल्स फेडरेशनचे राष्टÑीय अध्यक्ष डॉ. नामदेव किरसान, आर्णीचे आ. राजू तोडसाम, देवस्थान समितीचे संयोजक शंकर मडावी, सालेकसाचे नगराध्यक्ष विरेंद्र उईके, सविता पुराम, परसराम फुंडे, दरबूसिंह उईके, महेशराव कोरेटे, एम.एल.आत्राम, प्रल्हाद कुंभरे, आर.डी. आत्राम, दुर्गावती आत्राम, हिरा मडावी उपस्थित होते.
काय आहे इतिहास?
कचारगड येथे आशिया खंडातील सर्वात मोठी नैसर्गिक गुफा असून या गुफा परिसरात माँ काली कंकाली देवस्थान, माता जंगो आणि बाबा जंगो, शंभूसेक यांचे वास्तव्य आहे. या ठिकाणी गोंडी संस्कृतीचे रचनाकार शंभू गौरा पहांदी पारी कुपार लिंगो, संगीत सम्राट हिरासुका पाटालीर, ३३ कोट सगापेन आणि १२ पेना चे ७५० गणगोत, सल्ला गांगरा शक्ती यांचे वास्तव्य आहे. त्यांचा आत्मा येथे वास करतो अशी गोंडी धर्माची मान्यता व श्रद्धा आहे. ३३ कोट सगोपन या ठिकाणातून देशात पसार झाले. त्यांचे वंशज म्हणून आदिवासी समाज जन्माला आला. यामुळे सर्व देशभरातील आदिवासी भाविक माघ पौर्णिमेला आपल्या पूर्वजांच्या स्मरणात येथे येऊन महापूजा जातात.

Web Title: People from Kachargad-Dhanegaon,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.