भवभूतींविषयी विदर्भवासीयांनी रास्त अभिमान बाळगावा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:34 AM2021-08-18T04:34:48+5:302021-08-18T04:34:48+5:30

गोंदिया : भवभूती हे वैदर्भीय संस्कृत महाकवी असून, ते कविकुलगुरु कालिदासांच्या समकक्ष मानले जातात. अनेक श्रेष्ठ साहित्यिक या दोन्ही ...

People of Vidarbha should be really proud of Bhavabhuti () | भवभूतींविषयी विदर्भवासीयांनी रास्त अभिमान बाळगावा ()

भवभूतींविषयी विदर्भवासीयांनी रास्त अभिमान बाळगावा ()

Next

गोंदिया : भवभूती हे वैदर्भीय संस्कृत महाकवी असून, ते कविकुलगुरु कालिदासांच्या समकक्ष मानले जातात. अनेक श्रेष्ठ साहित्यिक या दोन्ही महाकवींची तुलना करण्यात स्वत:ला धन्य समजतात. महाकवी भवभूती हे विदर्भाच्या अतिपूर्वेकडील पद‌्मपूर (आमगाव) येथे आठव्या शतकात होऊन गेले. त्यामुळे भवभूतींविषयी विदर्भवासीयांनी रास्त अभिमान बाळगावा, असे प्रतिपादन इतिहासकार प्राचार्य ओ. सी. पटले यांनी केले.

भवभूती रिसर्च अकॅडमीच्या वतीने आयोजित छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते. आठव्या शतकात पद‌्मपूर ही एक धर्ममय नगरी असून, राष्ट्रकुट राजवंशाची राजधानी होती. भवभूतींच्या काळात पद‌्मपूर येथे राजा नन यांचे शासन होते. प्राचीन पद‌्मपूर नगरीच्या ठिकाणी सध्या पद‌्मपूर नावाचे गाव आहे. पद‌्मपूरच्या परिसरात प्राचीन पद‌्मपूर नगरीचे असंख्य अवशेष आढळतात. ब्रिटिश शासनकाळापासून पद‌्मपूर हे पुरातत्व विभागाद्वारे संरक्षित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. अशा आशयाचे लोखंडी फलक पद‌्मपूर परिसरात लागले आहे. सध्या पद‌्मपूरच्या फक्त ३ किमी. पूर्वेस आमगाव हे शैक्षणिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रगतनगर तालुक्याचे ठिकाण आहे. पद‌्मपूर व भवभूतींच्या इतिहासाला प्रकाश झोतात ठेवण्याचे कार्य फार पूर्वीपासून आमगावच्याच कोणत्या ना कोणत्या भवभूतींच्या चाहत्यांकडून होत आहे.

सन २०००मध्ये भवभूती रिसर्च अकॅडमी तयार करण्यात आली. या अकॅडमीने सहा महिने पद‌्मपूरला नित्य नियमित जाऊन ऐतिहासिक अवशेष व भवभूतींच्या इतिहासावर संशोधन केले. या काळात त्यांनी काही भूमिगत ऐतिहासिक पाषाण प्रतिमा जमिनीतून बाहेर काढल्या. उपयुक्त ठिकाणी त्यांची जमवाजमव केली. आवश्यक फोटोग्राफ‌्स काढून घेतले. हे करीत असताना नागपूरहून प्रकाशित होत असलेल्या सर्व आघाडीच्या वर्तमानपत्रांतून भवभूती व पद‌्मपूरच्या इतिहासाविषयी बातम्या झळकल्या. परिणामस्वरूप पुरातत्व विभाग नागपूर व औरंगाबाद शाखांनी पद‌्मपूरच्या ऐतिहासिक अवशेषांचे संरक्षण करण्याकडे विशेष लक्ष पुरवून अनेक ठिकाणी सुरक्षा भिंती उभाराव्या लागल्या. पद‌्मपूर येथील ऐतिहासिक अवशेषांचे संरक्षण व्हावे या दृष्टीने जी संरक्षणात्मक व्यवस्था दिसून येत आहे, त्याचे श्रेय भवभूती रिसर्च अकॅडमी या संस्थेला आहे. भवभूती हे विदर्भाचे एक तेजस्वी मानबिंदू आहेत. वैदर्भीय साहित्यिकांनी भवभूतींना आपल्या लिखाणात केंद्रीय स्थान देऊन त्यांना अमाप लोकप्रियता प्राप्त करून द्यावी, असेही इतिहासकार प्राचार्य पटले यांनी म्हटले आहे. यावेळी भवभूती रिसर्च अकॅडमीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Web Title: People of Vidarbha should be really proud of Bhavabhuti ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.