जि.प. निवडणुकीत आपला उमेदवार कोण? शेकोट्यांवर रंगतेय चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2021 04:17 PM2021-12-05T16:17:43+5:302021-12-05T16:24:10+5:30
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकरिता सोमवारी (दि. ६) दुपारी ३ वाजेपर्यंत नामांकन अर्ज दाखल करता येणार आहे. यामुळे गावागावातील चावडीवर निवडणुकीची चर्चा रंगू लागली आहे.
गोंदिया : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक ही स्थानिक पातळीवरची निवडणूक असल्याने यात गावकऱ्यांना फारच रस असतो. उमेदवारी कोणाला मिळते यापासून ते मतदारांचा कौल नेमका कुणाच्या बाजूने राहील, लढत कशी होणार, कोण अधिक सरस ठरेल याचीच चर्चा असते. यंदा जिल्हा परिषदेची निवडणूक गुलाबी थंडीत होत असल्याने शेकोट्यांवर रात्री उशिरापर्यंत चर्चा रंगत आहे.
जिल्हा परिषदेच्या ५३ व ८ पंचायत समितीच्या १०६ जागांसाठी सार्वत्रिक निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. ६ डिसेंबरपर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. नामांकन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा फक्त १ दिवस शिल्लक राहिला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकरिता सोमवारी (दि. ६) दुपारी ३ वाजेपर्यंत नामांकन अर्ज दाखल करता येणार आहे. यामुळे गावागावातील चावडीवर निवडणुकीची चर्चा रंगू लागली आहे. थंडीपासून बचावाकरिता शेकोटीसमोर होत असलेल्या गावकऱ्यांच्या बैठकीत अमुक-तमुक पक्षाचा उमेदवार कोण, अशी चर्चा रंगू लागली आहे.
जिल्ह्यात निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस तापू लागले आहे. २१ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या मतदान प्रक्रियेसाठी ६ डिसेंबरपासून प्रचार अभियानाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे गट व गणातील उमेदवार कोण याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेला फक्त एक दिवस शिल्लक राहिला आहे. असे असले तरी अद्यापपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने अधिकृत उमेदवाराची यादी प्रसिद्ध केली नाही. त्यामुळे उमेदवारांचे नाव पक्षाच्या गुलदस्त्यातच दडले आहे तर दुसरीकडे उमेदवारी आपल्यालाच मिळणार, असा विश्वास दर्शवून गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांनी मतदारांशी संपर्क साधणे सुरू केले आहे.
बहुतेक ठिकाणी तिरंगी लढती
जिल्ह्यातील सर्वच गट व गणांमध्ये निश्चितपणे तिरंगी लढतीचे चित्र पाहावयास मिळत आहे. तर गोंदिया विधानसभा क्षेत्रातील गणामध्ये चौरंगी लढतीचे चित्र राहणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, चाबी संघटना या प्रमुख पक्षांचा समावेश आहे. याशिवाय बसपा, शिवसेना, मनसे व वंचित बहुजन आघाडी हेदेखील काही गट व गणांमध्ये निवडणूक लढविण्याच्या तयारी लागले आहेत.