लोकसहभागातून वनमहोत्सव १ जुलैला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2017 01:21 AM2017-06-30T01:21:42+5:302017-06-30T01:21:42+5:30
राज्य शासनाच्या ४ कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत जवळील ग्राम बोदरा-देऊळगाव येथे गावकऱ्यांच्या सक्रिय सहभागातून
ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग : बोदरा येथे २२०० झाडांची लागवड
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : राज्य शासनाच्या ४ कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत जवळील ग्राम बोदरा-देऊळगाव येथे गावकऱ्यांच्या सक्रिय सहभागातून येत्या १ जुलै रोजी वनमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी क्षेत्र सहायक कार्यालयांतर्गत बोदरा बीटमध्ये वनमहोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. बोदरा येथील पटाच्या दानी जवळील झुडपी जंगल २३७/२ मधील २ हेक्टर जागेत बोदरा-देऊळगाव येथील गावकऱ्यांच्या लोकसहभागातून विविध प्रजातींच्या २२०० वृक्षांची लागवड शनिवारी (दि.१) करण्यात येणार असल्याचे प्रभारी क्षेत्र सहायक एस.एन.पंधरे यांनी सांगितले.
१ जुुलैच्या आयोजित वृक्ष लागवड कार्यक्रमात बोदरा व देऊळगाव गावकऱ्यांच्या प्रतिसाद मिळून लोकसहभागातून २ हजार २०० वृक्षांची लागवड श्रमदानातून केली जाणार आहे. क्षेत्र सहायक एस.एन.पंधरे, वनरक्षक पी.टी.दहिवले यांनी ग्रामस्थांची सभा घेऊन वृक्ष लागवडीसंबंधी जाणीव जागृती केली.
मानवाला वृक्ष किती फायदेशीर आहेत, गावाजवळील जंगलापासून होणारे दैनंदिन फायदे याबाबद माहिती देऊन गावकऱ्यांचे मन वळविण्यात वनविभागाचे अधिकारी यशस्वी झाले. शनिवारचा (दि.१) वनमहोत्सव साजरा करण्यासाठी बोदरा व देऊळगाव येथील ग्रामस्थ सरसावले.
गावातील वन समितीचे अध्यक्ष भाष्कर कवरे, सरपंच जयवंता झोळे, पोलीस पाटील यशवंत कापगते, पो.पा. नाशिक कापगते, ग्रा.पं.सदस्य आनंदराव चौधरी, विनोद बनकर, सदस्या लक्ष्मी उईके, निरुता नंदेश्वर, मनोज झोळे, पुरुषोत्तम बडोले, सदस्या लक्ष्मी उईके, निरुता नंदेश्वर, मनोज झोळे, पुरुषोत्तम बडोले, तेजराम झोळे, सतिश कावळे तसेच गावकरी वनमहोत्सवासाठी अविरत प्रयत्न घेत आहेत. पहिल्या प्रथमच मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होत असल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन हजारावर झाडांची लागवड स्वत: गावकरी करणार आहेत.
वृक्ष लागवडीचा हा कार्यक्रम बोदरा गावात यशस्वी झाल्यास हे गाव येणाऱ्या काळात एक आदर्श गाव म्हणून ओळखले जाईल.
सहभागी होणाऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन
वृक्ष लागवडीसाठी गावकरी जोमाने कामाला लागले असून यात त्यांचे सहकार्य लाभाणार आहे. तरिही या उपक्रमात सहभागी होणाऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. वृक्ष लागवड उपक्रमात सहभागी झालेल्यांना या महाप्रसादाचा लाभ घेता येणार आहे.