लोकप्रतिनिधींनी लोकांच्या समस्या सोडवाव्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:17 AM2018-04-30T00:17:31+5:302018-04-30T00:17:31+5:30
लोकप्रतिनिधींवर लोकांच्या समस्या मार्गी लावण्याची जबाबदारी असते. मात्र वेळीच ते आपली जबाबदारी पार पाडताना दिसत नाही. क्षेत्राच्या लोकप्रतिनिधींनी लोकांच्या समस्यांचे निराकरण त्याच वेळी करावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी सहषराम कोरोटे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : लोकप्रतिनिधींवर लोकांच्या समस्या मार्गी लावण्याची जबाबदारी असते. मात्र वेळीच ते आपली जबाबदारी पार पाडताना दिसत नाही. क्षेत्राच्या लोकप्रतिनिधींनी लोकांच्या समस्यांचे निराकरण त्याच वेळी करावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी सहषराम कोरोटे यांनी केले.
तालुक्यातील धमदीटोला येथे अमित विद्यालयाच्या प्रांगणात शनिवारी (दि.२८) आदिवासी बहुउद्देशिय धुर्व गोंड समाज संस्थेच्या वतीने आदिवासी धुर्व गोंड समाजाचा आदर्श सामूहिक विवाह सोहळा पार पडला. याप्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.
उद्घाटन जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सविता पुराम यांच्या हस्ते, धमदागडचे केंद्रीय अध्यक्ष एम.डी. ठाकूर यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने पं.स. सदस्य गणेश तोफे, डीआरडीए सदस्य हरिचंद उईके, ओरडबांध महासभेचे प्रवक्ता प्रेमदास पंधरे, महामंत्री उत्तम मरकाम, तालुका काँग्रेसचे महासचिव बळीराम कोटवार, विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष नरेश राऊत, माजी सभापती देवकी मरई, वसंत पुराम, काँग्रेस कार्यकर्ते छगनलाल मुंगनवार उपस्थित होते.
कोरोटे पुढे म्हणाले, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लोकांचे व त्यांच्या क्षेत्राचा सर्वांगिण विकास करण्याकरिता शासनाने विविध लोकसभा व विधानसभा क्षेत्र त्या-त्या समाजाकरिता आरक्षित ठेवले आहे. त्या क्षेत्रातून खासदार व आमदार निवडून येतात. मात्र ते लोकसभा किंवा विधानसभेत जेथे लोकांच्या हितार्थ कायदा आणि निर्णय घेतले जातात तेथे त्यावेळी त्या कायदा व निर्णयाचा विरोध करीत नाही. मात्र तो कायदा किंवा निर्णय तयार झाल्यानंतर त्या खात्यातील मंत्र्यांना तो कायदा किंवा निर्णय मागे घेण्यासंबंधात निवेदन देतात. ही त्या लोकप्रतिनिधींची शोकांतिका आहे. असे न करता ज्यावेळी शासन लोकांच्या विरुद्ध कायदा किंवा निर्णय घेते त्याचवेळी विरोध करुन असा निर्णय किंवा कायदा तयार करण्यास रोखू शकेल तोच खरा लोकप्रतिनिधी म्हणता येईल, असे ते म्हणाले. प्रास्ताविक जिल्हा कमिटी सदस्य सोनू नेताम यांनी मांडले.
संचालन पंचराम मडावी यांनी केले. आभार किशोर नेताम यांनी मानले. या वेळी परिसरातील महिला, पुरुष व युवा वर्ग तसेच वºहाडी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
१० जोडपी परिणयबद्ध
सदर विवाह सोहळ्यात आदिवासी समाजातील एकूण १० जोडप्यांना सामूहिकरित्या परिणयबद्ध करण्यात आले. या वेळी उपस्थित पाहुण्यांनी सर्व जोडप्यांना भेटवस्तू व आशीर्वाद दिला.