सर्व रुग्णालयाचे त्वरित फायर ऑडिट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 05:00 AM2021-07-31T05:00:00+5:302021-07-31T05:00:02+5:30

तिसऱ्या लाटेची तयारी करण्यात आली असून, पेडियाट्रिक वार्डसुद्धा सज्ज ठेवण्यात आले आहेत. आरोग्य विभागाने वैद्यकीय यंत्रणा सुसज्ज ठेवावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तिसऱ्या लाटेसाठी वैद्यकीय सुविधा अद्ययावत करण्यात येत असून, प्राणवायू प्रकल्पनिर्मितीवर भर देण्यात येत आहे. ऑक्सिजन बेड वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Perform immediate fire audits of all hospitals | सर्व रुग्णालयाचे त्वरित फायर ऑडिट करा

सर्व रुग्णालयाचे त्वरित फायर ऑडिट करा

Next
ठळक मुद्देप्राजक्ता लवंगारे : तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय यंत्रणेचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :  कोरोनाची संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता आरोग्य यंत्रणेत सुधारणा करण्याची गरज आहे, तसेच आरोग्य सुविधेत वाढ करून रुग्णांची गैरसोय होऊ नये या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज आहे. रुग्णालयाचे फायर, इलेक्ट्रिकल व स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याच्या सूचना विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या. 
विभागीय आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शुक्रवारी (दि.३०) त्या प्रथमच जिल्हा दौऱ्यावर आल्या असता त्यांनी विविध विषयांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी यंत्रणेला सूचना केल्या. या दौऱ्यात त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, प्राणवायू निर्मिती प्लांट, जिल्हा क्रीडा संकुल येथील कोविड रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. 
यावेळी जिल्हाधिकारी नयना गुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड आदी उपस्थित होते. जिल्हाभरात कोविड केअर सेंटरमध्ये ९२२ खाटा उपलब्ध असून, त्यापैकी ३२५ खाटा ऑक्सिजनच्या आहेत. जिल्हा क्रीडा संकुल येथे शंभर खाटांचे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल उभारण्यात आल्याची माहिती दिली. 

लसीकरणात जिल्ह्याची आघाडी 
- लसीकरणामध्ये जिल्ह्याचे काम चांगले असून, जिल्ह्याला कोविशिल्ड लसीचे ३ लाख ८८ हजार २० व कोव्हॅक्सिन लसीचे २ लाख २३ हजार २१०, असे एकूण ६ लाख ११ हजार २३० डोस प्राप्त झाले. आतापर्यंत ५ लाख ७५ हजार ८५८ व्यक्तींनी लस घेतली आहे. पहिला डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या ४ लाख ५७ हजार ५७९, तर दोन्ही डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या १ लाख १८ हजार २८८ आहे. जिल्ह्यात सध्या दहा क्रियाशील रुग्ण असून, जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.१९ टक्के, तर रिकव्हरी रेट ९८.२३ टक्के आहे.
कुशल मनुष्यबळाची आवश्यकता
- तिसऱ्या लाटेची तयारी करण्यात आली असून, पेडियाट्रिक वार्डसुद्धा सज्ज ठेवण्यात आले आहेत. आरोग्य विभागाने वैद्यकीय यंत्रणा सुसज्ज ठेवावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तिसऱ्या लाटेसाठी वैद्यकीय सुविधा अद्ययावत करण्यात येत असून, प्राणवायू प्रकल्पनिर्मितीवर भर देण्यात येत आहे. ऑक्सिजन बेड वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले.
आशा वर्कर यांचा योग्य सन्मान करा
- कोविडकाळात आशा वर्कर यांनी उत्कृष्ट काम केल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे यांनी निदर्शनास आणून दिले असता कोरोनाकाळात आशा वर्कर यांनी सर्वच ठिकाणी चांगले काम केल्याचे नमूद करून आशा वर्कर खऱ्या कोरोना योद्धा आहेत असे लवंगारे म्हणाल्या. सर्व आशा वर्कर यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्याच्या सूचना केल्या. 

 

Web Title: Perform immediate fire audits of all hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.