साहित्याने माणूस अंतरंग जाणू शकतो
By admin | Published: January 26, 2017 01:41 AM2017-01-26T01:41:36+5:302017-01-26T01:41:36+5:30
साहित्याने माणसाला माणुसकी दिली. विज्ञानाने माणसाला ज्ञान दिले. विज्ञानाने माणूस अंतरीक्ष
बंडोपंत बोढेकर : ‘विज्ञान आणि साहित्य’ विषयावरील व्याख्यान
अर्जुनी मोरगाव : साहित्याने माणसाला माणुसकी दिली. विज्ञानाने माणसाला ज्ञान दिले. विज्ञानाने माणूस अंतरीक्ष जाणू शकतो. साहित्याने माणूस अंतरंग जाणू शकतो. आपण अंतरंग साहित्यातून व्यक्त करु शकतो. साहित्यात व्यक्त झालेलं लेखकांचे अंतरंग, मनातली खदखद, भावना, तरंग संवेदनशीलतेने वाचक टिपू शकतो. साहित्यातून झोपी गेलेला समाज, विकृत झालेला समाजसुद्धा देशासाठी उभा राहू शकतो. मानवातील कुप्रवृत्ती, कलह, व्यसनापासून मुक्ती मिळते, असे प्रतिपादन विज्ञान व साहित्याचे अभ्यासक बंडोपंत बोढेकर, गडचिरोली यांनी केले.
ते गोंदिया जिल्हा परिषद शिक्षण विभाग व जिल्हा ग्रंथ कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या विज्ञान आणि साहित्य या विषयावरील मुलाखतीत ते बोलत होते.
देशाचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी भारत २०२० पर्यंत महासत्ता होईल, असं म्हटलं होतं. आजचा युवक हा विश्वाचा नकाशा. गावावरुन देशाची परीक्षा, असं म्हटलं जाते. राष्ट्रसंतांनीसुद्धा गावाची संकल्पना त्या कालखंडात वर्णिली होती. गावातील प्रत्येक घर उद्योगी, तेथील प्रत्येक व्यक्ती गावातील सर्वांगिण प्रगतीचा तंत्रज्ञ असतो. राष्ट्रसंतांची खंजेरी वाजते. त्यांचे भजन कानावर येतात. त्यांनी विज्ञान सांगितला आहे. ते विज्ञानवादी होते. तुकडोजी महाराज हे कालचे संत वाटत नाही तर ते आजचे असल्याचे वाटते.
विज्ञानाला भावना नसतात आणि साहित्य भावनेवर आधारलेले असते. मनाचं विचार साहित्य. मेंदूचं विचार विज्ञान. साहित्य आणि विज्ञानाचा निर्माता माणूस आहे. विज्ञानात माणसाची चूक सहन केली जात नाही. विज्ञानाची शिकवणूक म्हणजे काटेकोरपणा. विज्ञान आणि साहित्य हे दोन्ही मानवाच्या प्रगतीसाठी आहेत. वैज्ञानिक दृष्टी म्हणजे जे जसं आहे तसं स्वीकारणे होय. साहित्याचा अर्थ तुमच्या मनातला वाईट विचारसुद्धा दखलपात्र साहित्यात व्यक्त करु शकता. मात्र आपण जीवनात तसे वागले तर त्याचा निषेध होईल. जीवन कसं आहे, ते कसं असावे, हा संदेश देण्यासाठी साहित्य आहे. माणसाचा माणूसपण जागृत करणे म्हणजे प्रबोधन. विज्ञान हे ज्ञान देऊ शकतं, प्रबोधन नव्हे.
मोबाईल हा विज्ञानाचा आविष्कार आहे. विज्ञान हे साहित्यातून आविष्कारीत झाले आहे. माणसानं कुठल्याही गोष्टीत विज्ञानवाद बघावं. प्रत्येक गोष्टीत विज्ञान आहे. मात्र दृष्टी तशी असली पाहिजे. पहिला वैज्ञानिक हा शेतकरी आहे. एका बियाण्यांपासून अनेक बियाणे तयार करण्याचे काम त्याने केले आहे. विज्ञानाने विद्यार्थ्यांच्या जाणीवा विकसित होतात, त्यातूनच प्रगती होते. लेखकसुद्धा विज्ञानवादी असावेत. अंधश्रद्धा नको, अंधश्रद्धेचे बालमनावर विपरित परिणाम होतात. प्रयोग कृतीतून घडले पाहिजेत. व्यसनाधिनतेमुळे युवकातील उदासीनता वाढली आहे. ती घालण्यासाठी विज्ञान अंगिकारला पाहिजे. स्वत:चा शोध घेणे म्हणजे अध्यात्म. मानवी मनाच्या अवस्था सकारात्मक दृष्टीने स्वीकारल्या पाहिजे. मानवी जीवन उन्नत करण्यासाठी विज्ञान आणि साहित्याची सांगड घालणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. (तालुका प्रतिनिधी)