लाडकी बहीण योजनेचे कागदपत्रे आणायला गेलेला व्यक्ती ट्रकच्या धडकेत ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 09:46 PM2024-07-03T21:46:10+5:302024-07-03T21:46:38+5:30
वडसा-कोहमारा राज्य मार्गावरील घटना : लाडे कुटुंबावर संकट
अर्जुनी मोरगाव : राज्य शासनाने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेचे दस्तऐवज आणण्यासाठी तहसील कार्यालयात येणाऱ्या दुचाकीला वाहनाला ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. ३) दुपारी १ वाजता मोरगाव टी पॉइंटवर घडली. शिवलाल चुनीलाल लाडे (४२, रा. निलज, ता. अर्जुनी) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, शिवलाल हा बुधवारी दुपारी १२:४५ वाजताच्या दरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्र गोळा करण्यासाठी पत्नीला घेऊन अर्जुनी मोरगावच्या तहसील कार्यालयात जाण्यासाठी निघाला होता. तो अर्जुनीला परत येत असताना मोरगाव टी पॉइंटवरील हिमालय बारजवळ वडसाकडून कोहमाराकडे जाणाऱ्या ट्रकने त्याच्या दुचाकीला धडक दिली.
ट्रकच्या धडकेत शिवलालला गंभीर दुखापत झाली. ट्रक चालक पळून जात असताना त्याला नवेगावबांधनजीक स्थानिक पोलिसांनी पकडले. गंभीर दुखापत झालेल्या शिवलालला स्थानिक ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी अर्जुनी मोरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बिट अंमलदार रोशन गोंडाणे पुढील तपास करीत आहेत.