सारस पक्ष्यांवर किटकनाशकाचे संकट; संरक्षण करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 11:51 AM2020-08-31T11:51:13+5:302020-08-31T11:54:16+5:30

एकीकडे सारस संवर्धनासाठी तरूण झटताहेत तर दुसरीकडे सारसांचे वास्तव्य असलेल्या परिसरात थायमेटचा वापर वाढल्याने त्यांचे अस्तीत्व धोक्यात आले आहे.

Pesticide crisis on storks; Demand for protection | सारस पक्ष्यांवर किटकनाशकाचे संकट; संरक्षण करण्याची मागणी

सारस पक्ष्यांवर किटकनाशकाचे संकट; संरक्षण करण्याची मागणी

Next
ठळक मुद्देबंदी असलेलेही किटकनाशके बाजारातवाचवा सारसांची घरटी

नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : निसर्गाचा लाजाळू पक्षी व शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून गणल्या जाणाऱ्या सारसाचे निवासस्थान धानाचे पीक असलेल्या शेतात असते. परंतु धानाचे पीक जोमदार यावे यासाठी शेतकरीवर्ग धानावर थायमेट नावाच्या किटकनाशकाची फवारणी करतात. हे थायमेट सारसांचे कर्दनकाळ ठरत आहे. एकीकडे सारस संवर्धनासाठी तरूण झटताहेत तर दुसरीकडे सारसांचे वास्तव्य असलेल्या परिसरात थायमेटचा वापर वाढल्याने त्यांचे अस्तीत्व धोक्यात आले आहे.

महाराष्ट्रात केवळ गोंदिया जिल्ह्यात सारस पहायला मिळते. पाच वर्षापूर्वी गोंदिया जिल्ह्यात सारसांची संख्या आता ६० च्या घरात होती. परंतु किटनाशक व करंट लागून सतत सारसांचा मृत्यू होत असल्यामुळे आता गोंदिया जिल्ह्यात सारसांची संख्या ४० च्या घरात आहे.पावासाळ्याचे दिवस सारसांच्या विनीचा हंगाम असतो. सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत या सारसांच्या घरट्यांचे संवर्धन झाल्यास सारसांच्या संवर्धनासाठी मदत होईल. आज घडीला गोंदिया जिल्ह्यातील सहा शेतकऱ्यांच्या शेतात सारसांनी घरटी तयार केली. परंतु या सहापैकी दोनच शेतकऱ्यांनी या घरट्यांची माहिती वनविभागाला किंवा निसर्गप्रेमींना दिली.

चार शेतकऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सारसांची संख्या वाढायला मदत होत नाही. सारस बचावाचा संदेश आजघडीला गोंदिया जिल्हाभर फिरल्यामुळे अनेक शेतकरी सारस संवर्धनासाठी पुढे येऊ लागलेत. परंतु अजूनही अनेक शेतकरी सारस संवर्धनासाठी पाहिजे तेवढे सहकार्य करीत नाहीत. परंतु सेवा संस्था, निसर्गपे्रमी आणि वनविभागाच्या प्रयत्नांमुळे सारसांची संख्या टिकवून ठेवण्यास मदत होत आहे. सारस संवर्धनासाठी सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार, अभिजीत परिहार, शशांक लाडेकर, अंकीत ठाकूर, दुष्यंत आकरे, चेतन जसानी, कन्हैया उदापुरे सारस संवर्धनासाठी काम करीत आहेत.

सारसांचा धानाला फायदाच
ज्या बांध्यामध्ये सारस अंडी घालते त्या बांधीतील छोट्या भागातील धानाची नासाडी होते. मात्र या धानातील सर्व किटक व परिसरातील धानातील किटक दररोज एक सारस जोडी तीन किलोच्या प्रमाणे आहार करीत असल्याने या धान पिकाला किटकनाशक लागत नाही. या बांधीतून त्या बांधीत दरवळणाऱ्या सारसाच्या पायाने धान पिकातील ओल्या मातीचे खुंदल होत असल्याने हे पीक जोमाने भरभराटीस येते. सारस असलेल्या शेतातील धान उत्पादन ४० टक्क्याने अधिक येत असल्याची माहिती निसर्ग मित्र व सेवा संस्थेचे सावन बहेकार यांनी दिली आहे.

जीवनकाळ १८ वर्षाचा
धान पिकात वावरणारा हा पक्षी पाच ते सहा फूट परिघाचा असतो. याची उंची तीन फूट असते, पांढऱ्या रंगाची दोन अंडी देतात.साधारणत : २०० ते २४० ग्रॅम वजन त्या अंड्याचे असते. २८ ते ३१ दिवस अंडी उबल्यावर पिल्लं बाहेर निघतात. त्यांचा रंग पिवळसर असतो. हे पिल्लं ५० ते ६० दिवसात उडायला लागतात. या पक्ष्यांच्या जिवनकाळ १८ वर्षाचा असतो.

यावर द्यावी सारसांची माहिती
ज्या शेतकऱ्यांच्या शेतात सारसांचा अधिवास असेल किंवा त्यांच्या शेतात घरटी आढळल्यास सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना किंवा वनविभागाला माहिती द्यावी. मो. ९४२०५१५०४१ सावन बहेकार व ८४४६४५५६२८ अभिजीत परिहार यावर द्यावी.

Web Title: Pesticide crisis on storks; Demand for protection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.