खड्डे उठले नागरिकांच्या जीवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 09:22 PM2017-09-26T21:22:11+5:302017-09-26T21:23:31+5:30
जिल्ह्यातील कुठल्याही मार्गावरुन गेल्यास त्या रस्त्यांवर खड्डे नसतील तर नवलच म्हणावे लागेल. याच खड्ड्यांमुळे मागील पंधरा दिवसात चार जणांना जीव गमावावा लागला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील कुठल्याही मार्गावरुन गेल्यास त्या रस्त्यांवर खड्डे नसतील तर नवलच म्हणावे लागेल. याच खड्ड्यांमुळे मागील पंधरा दिवसात चार जणांना जीव गमावावा लागला. मात्र यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेतली नाही. परिणामी हे खड्डेच आता नागरिकांच्या जीवावर उठल्याचे चित्र आहे.
शहरातील रस्ते नव्हे तर आमगाव-देवरी, गोंदिया- देवरी, सालेकसा, सडक-अर्जुनी, गोंदिया-तिरोडा यासर्वच मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. डाबंरी रस्त्यावरील खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने न बुजविल्याने त्यात पावसाचे पाणी साचून त्यांना आता गटारे स्वरुप आले आहे. यासर्वच मार्गावर दुचाकी आणि चारचाकी वाहनांची सतत वर्दळ असते. मात्र खड्डयांमुळे गेल्या काही दिवसांत अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मागील पंधरा दिवसांच्या कालावधीत खड्डयांमुळे चार जणांना नाहक जीव गमवावा लागला. तर पंधरा ते वीस जणांना गंभीर दुखापत झाली. खड्डयांमुळे रस्त्यांची चाळणी झाल्याचे चित्र असताना रस्त्यांची देखभाल दुरूस्तीची जबाबदारी असणारा सार्वजनिक बांधकाम विभाग गाढ झोपेत आहे. नागरिकांची ओरड वाढल्यानंतर या विभागाने डांबरी रस्त्यांवरील खड्डे मुरूम टाकून बुजविण्याचा प्रताप केला. मात्र त्यानंतर झालेल्या पावसाने खड्डयांमध्ये भरलेले मुरूम वाहून गेले. त्यामुळे खड्डे पुन्हा जैसे थे झाले. रस्त्यांवरील खड्डयांकडे संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधी देखील दुर्लक्ष करित असल्याने आता नागरिकांनीच यासाठी पुढाकार घेतला आहे.
गोंदिया येथील आठ ते दहा नागरिकांनी एकत्र येत रस्त्यांवरील खड्डयांकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी माहितीच्या अधिकारातंर्गत रस्त्यांवर आत्तापर्यंत करण्यात आलेला खर्च, रस्ते अपघातात किती बळी गेले, कितीदा रस्त्यांची दुरूस्ती करण्यात आली. याची माहिती मागविली आहे.
बांधकाम विभागाचे हात वर
जिल्ह्यातील मुख्य मार्गावरील रस्ते दुरूस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. नागरिकांनी जेव्हा या विभागाकडे रस्त्यांवरील खड्डयांची तक्रार केली. तेव्हा या विभागाच्या अधिकाºयांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत हातवर केले. विशेष म्हणजे या विभागातर्फे दरवर्षी रस्ते दुरूस्तीच्या नावावर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र त्यानंतर रस्त्यांवरील खड्डे कायम असल्याने हे कोट्यवधी रुपये कोणाच्या घश्यात जातात.यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.
अधिकाºयांना कंत्राटदारांची काळजी
रस्त्यांवरील खड्डयांमुळे मागील पंधरा दिवसात चार जणांचा बळी गेला. मात्र यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाला खड्डयांकडे लक्ष देण्याची गरज वाटली नाही. नागरिकांच्या हितापेक्षा त्यांना कंत्राटदारांच्या हिताची अधिक काळजी असल्याची ओरड आता नागरिक करित आहे.