निविदांवरील याचिका केली रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 10:06 PM2018-04-15T22:06:33+5:302018-04-15T22:06:33+5:30

नगर परिषदेने काढलेल्या निविदेत विविध कामांमधील अटी-शर्तींना घेऊन टाकण्यात आलेली याचिका अखेर नागपूर उच्च न्यायालयाने रद्द केली. त्यामुळे सुमारे २० कोटी रूपयांच्या या निविदांचा मार्ग मोकळा झाला आहे.

The petition on Nivid has been canceled | निविदांवरील याचिका केली रद्द

निविदांवरील याचिका केली रद्द

Next
ठळक मुद्देन्यायालयाचे आदेश : सुमारे २० कोटींच्या कामांचे भूमीपूजन आज

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नगर परिषदेने काढलेल्या निविदेत विविध कामांमधील अटी-शर्तींना घेऊन टाकण्यात आलेली याचिका अखेर नागपूर उच्च न्यायालयाने रद्द केली. त्यामुळे सुमारे २० कोटी रूपयांच्या या निविदांचा मार्ग मोकळा झाला आहे. तर नगर परिषद प्रशासनाकडून सोमवारी (दि.१६) या विविध विकास कामांचे भूमीपूजन केले जात आहे.
नगर परिषदेने विविध विकास कामांसाठी निविदा काढल्या होत्या. यासाठी ५० लाखांपेक्षा जास्त व ५० लाखांपेक्षा कमी अशा दोन भागांत निविदा काढल्या होत्या. यात ५० लाखांपेक्षा जास्त रकमेच्या कामांसाठी २ डिसेंबर २०१७ रोजी तर ५० लाखांपेक्षा कमीच्या कामांसाठी १८ डिसेंबर २०१७ रोजी निविदा काढण्यात आली होती व यासाठी निविदा टाकण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर २०१७ ठेवण्यात आली होती. मात्र ही कामे काही निवडक कंत्राटदारांनाच मिळावी यासाठी काही अटी व शर्ती टाकून निविदांची तारीख वाढविण्यात आल्याचे कंत्राटदारांचे म्हणणे होते व नगर परिषदेतील दोन कंत्राटदार न्यायालयात गेले होते.
तेव्हा नगर परिषद प्रशासनाकडून निविदा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर नगर परिषदेने १ फेब्रुवारी रोजी पुन्हा निविदा काढली होती तर ३ फेब्रुवारी रोजी शुद्धीपत्रक काढले होते. या निविदांतही काही निवडक कंत्राटदारांना कामे मिळावी यासाठी अटी -शर्ती टाकण्यात आल्याचे कंत्राटदारांचे म्हणणे होते. हे प्रकरण चांगलेच गाजत असताना अजयजीत मदनजीत वालीया यांनी नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने निविदा प्रक्रीया पूर्ण करा मात्र कार्यादेश देता येणार नाही असे आदेश दिले होते.
या प्रकरणाला घेऊन ७ मार्च रोजी सुनावणीझाली असता न्यायालयाने नगर परिषदेने लावलेल्या अटी अवैध नाहीत असे सांगत याचिका रद्द करून प्रकरण निकाली लावले. त्यामुळे आता या निविदांचा मार्ग मोकळा झाला असून नगर परिषदेने लगेच सोमवारी (दि.१६) सुमारे २० कोटींच्या या विकास कामांच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आयोजीत केला आहे.
पत्रिका ठरली चर्चेचा विषय
२० कोटींच्या विकास कामांचे भूमीपूजन केले जात असताना नगर परिषदेने यासाठी पत्रिका प्रकाशित केली. ही पत्रिका व्हॉट्सअ‍ॅप व फेसबूकवर फिरत होती. विशेष म्हणजे, नगर परिषदेचा कारभार पूर्णपणे मराठी भाषेतूनच व्हावा असा नियम असतानाही भूमीपूजनाची ही पत्रिका मराठी व हिंदी अशा दोन भाषांत होती. पत्रिकेतील मजकूर मराठी भाषेत असतानाच शेवटी नगराध्यक्षांनी शहरवासीयांना आवाहन केले असून ते मात्र हिंदी भाषेत आहे. हिंदी भाषी शहरवासीयांना समजावे यासाठी हिंदीतून आवाहन करण्यात आल्याचेही काहिंनी सांगीतले. मात्र नियमांना बगल देत करण्यात आलेला प्रयोग चर्चेचा विषय ठरला.

Web Title: The petition on Nivid has been canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.