जनावरे कत्तलीसाठी नेणाऱ्यांची पोलिसांवर दगडफेक
By Admin | Published: September 21, 2016 12:22 AM2016-09-21T00:22:56+5:302016-09-21T00:22:56+5:30
ट्रकमध्ये जनावरे डांबून त्यांना कत्तलखान्यात नेणाऱ्यांना पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवर आरोपींनी दगडफेक केली
तीन पोलीस जखमी : पोलिसांनी केला लाठीचार्ज
गोंदिया : ट्रकमध्ये जनावरे डांबून त्यांना कत्तलखान्यात नेणाऱ्यांना पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवर आरोपींनी दगडफेक केली. ही घटना गोंदिया तालुक्याच्या चंगेरा येथे मंगळवारी पहाटे ३ वाजतादरम्यान घडली. पोलिसांनी आपल्या बचावासाठी लाठीचार्ज केला. या दगडफेकीत तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले तर त्यांच्या वाहनाच्या काचा फुटल्या. जनावरांना कत्तलखान्यात नेत असलेल्या १५ जनावरांना जप्त करण्यात आले. यात नऊ जणांना अटक करण्यात आले तर ६ लोक फरार आहेत.
मध्यप्रदेशच्या बैल बाजारातून अवैधरित्या जनावरे खरेदी करून चंगेरा येथून शेकडो जनावरे २० सप्टेंबरच्या पहाटे कत्तलखान्यात जात होती. सात ट्रकमध्ये जनावरे डांबून नेत असताना याची माहिती गोंदियाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांना मिळाली. रावणवाडी पोलिसांना सोबत घेऊन कारवाई करण्यासाठी ते गेले असता त्यांना पाहून सहा ट्रक पळवून नेण्यात आले. तक पोलीसांनी १२ म्हशींनी भरलेला एक ट्रक पकडला. यावेळी १५ जणांनी पोलिसांवर दगडफेक करीत हल्ला केला. यासंदर्भात पोलिसांनी १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. चंगेरा येथून नेहमीच जनावरे कत्तलीसाठी जात असल्याची माहिती आहे. (तालुका प्रतिनिधी)
जनावरांचा ट्रक पकडला
गोंदिया : रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या शालीमार हॉटेल समोर रिंगरोड येथे एमएच ३१/एपी १५९० या वाहनात १४ म्हशी डांबून कत्तलखान्यात नेत असताना रामनगर पोलिसांनी रविवारी रात्री ८.४० वाजतादरम्यान सदर ट्रक जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या ट्रकची किंमत १० लाख तर जनावरांची किंमत एक लाख २० हजार असा एकूण ११ लाख २० हजार रूपये सांगितले जाते. या प्रकरणात शारीख गफ्फूर शहा (२७,रा.नागपूर), सुनिल हौसलाल उके (१९,रा.चंगेरा), अमितभाई (रा.चंगेरा) व इतर दोन अशा पाच जणांवर प्राण्यांना निदर्यतेने वागविण्याचा कायदा ११ (१) (ड)(ई) सहकलम ड (अ) (ब) ६,९, मोटार वाहन कायदा कलम १३० (३), १७७, १३२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
महिलेवर प्राणघातक हल्ला
जनावरे कत्तलीसाठी जात असल्याची माहिती बाबू नावाचा इसम पोलिसांना देतो अशी शंका या जनावरांची तस्करी करणाऱ्या लोकांच्या मनात आल्याने त्यांनी आधी त्याच्या घरावर हल्ला चढविला. यावेळी बाबूच्या बचावासाठी आलेल्या त्याच्या आई नेहबीद्दीन यांच्या डोक्यावर रॉडने मारून त्यांना ठार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणात हल्लेखोरांवर खूनाचा प्रयत्न म्हणून भादंविच्या कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
तीन पोलीस कर्मचारी
गंभीर जखमी
जनावरांची तस्करी करणाऱ्या आरोपींनी पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत उपविभागीय कार्यालयातील पोलीस कर्मचारी माधव केंद्रे, संदीप बल्लारी व रावणवाडीचे माधव केंद्रे हे गंभीर जखमी झाले. पोलिसांनी चंगेरा गावात चोख बंदोबस्त ठेवला होता.