पेट्रोलच्या दराचा पुन्हा भडका, प्रीमिअम पेट्रोलचे ९९.६४ पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 05:00 AM2021-02-17T05:00:00+5:302021-02-17T05:00:12+5:30
मागील चार महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत सातत्याने वाढ होत असून, मागील चार महिन्यांत पेट्रोलचे दर ११ रुपये, तर डिझेलचे दर सहा रुपयांनी वाढले आहेत. मंगळवारी पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळे १ लिटर प्रीमिअम पेट्रोलसाठी आता वाहनचालकांना ९९.६४ रुपये मोजावे लागणार आहेत; त्यामुळे वाहनचालकांना थेट शंभर रुपयांची नोट द्यावी लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत सातत्याने वाढ केली जात आहे. मंगळवारी गोंदिया येथे साधे पेट्राेल ९६.८१ रुपये प्रतिलिटर, तर प्रीमिअम पेट्रोलचा दर ९९.६४ रुपये प्रतिलिटर होता. डिझेलचा दरही ८५.२५ रुपये होता. पेट्रोलचा दर १०० रुपयांवर गेल्याने याचा परिणाम इतरही गोष्टींवर होत आहे. महागाईत वाढ होत असल्याने सर्वसामान्यांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे.
मागील चार महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत सातत्याने वाढ होत असून, मागील चार महिन्यांत पेट्रोलचे दर ११ रुपये, तर डिझेलचे दर सहा रुपयांनी वाढले आहेत. मंगळवारी पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळे १ लिटर प्रीमिअम पेट्रोलसाठी आता वाहनचालकांना ९९.६४ रुपये मोजावे लागणार आहेत; त्यामुळे वाहनचालकांना थेट शंभर रुपयांची नोट द्यावी लागणार आहे.
पेट्रोलच्या दरवाढीमुळे वाहतूक भाड्यातही वाढ झाल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या दरातही वाढ झाली आहे. मंगळवारी शहरातील बाजारपेठेत भाजीपाल्याचे दरही काही प्रमाणात वधारले होते. त्यामुळे पेट्रोल दरवाढीचा फटका थेट गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडत आहे; तर गृहिणींना महिन्याचे बजेट सांभाळताना मोठी कसरत करावी लागत आहे.
पेट्रोल-डिझेलसह गॅस सिलिंडरच्या किमतीही ५० रुपयांनी वाढल्या आहेत. १० फेब्रुवारीला गॅस सिलिंडरचे दर ७८५ रुपये होते. त्यात आता पुन्हा ५० रुपयांनी वाढ झाल्याने हे दर ८३५ रुपयांवर पोहोचले आहेत. त्यावर केवळ ५० ते ६० रुपये अनुदान मिळते. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य त्रस्त झाल्याचे चित्र आहे.
पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीमुळे ऑटोे आणि बसेसच्या भाड्यात सुध्दा वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे याचा पुन्हा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसण्याची शक्यता आहे. सातत्याने वाढ होत असलेल्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये रोष व्याप्त आहे.
दिवसेंदिवस वाढणारे पेट्रोल-डिझेलचे दर हे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडत आहे. कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर आता कुठे संसाराची घडी बसली होती. मात्र वाढत्या पेट्रोल-डिझेलने गोरगरिबांचे हाल होत आहेत.
’दिव्या भगत
सामाजिक कार्यकर्ता
जिल्ह्यात एकीकडे तरुणांना अपेक्षित रोजगार नाही तर दुसरीकडे वाढत्या महागाईचा सामना करावा लागत आहे.
कोरोनाच्या काळात वाहतूक व्यवस्था बंद झाली होती. मात्र त्यानंतर आता वाढत्या महागाईच्या संकटाने जगणे मुश्कील झाले आहे.
-देवा शेंडे ,
सुशिक्षित तरुण, गोंदिया