पीएच.डी. पात्रता परीक्षेच्या वेळापत्रकाची चुकविली वेळ
By admin | Published: September 18, 2016 12:34 AM2016-09-18T00:34:40+5:302016-09-18T00:34:40+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा आगळा-वेगळा कारनामा समोर आलेला असून पि.एच.डी.च्या पात्रता परीक्षेच्या ओळखपत्रामध्ये देण्यात....
विद्यार्थ्यांच्या प्रसंगावधानाने झाली दुरुस्ती : नागपूर विद्यापीठाचा अफलातून कारभार
पांढरी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा आगळा-वेगळा कारनामा समोर आलेला असून पि.एच.डी.च्या पात्रता परीक्षेच्या ओळखपत्रामध्ये देण्यात अलोल्या वेळेत पी.एम. ऐवजी ए.एम. दिल्याने विद्यार्थ्यांची फजिती झाली. तालुक्यातील निशांत हिरालाल राऊत नामक विद्यार्थ्याने प्रसंगावधान साधत वेळापत्रकामध्ये दुरुस्ती करुन घेतली अन्यथा विद्यार्थ्यांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला असता.
सविस्तर वृत्त असे की, पीएचडीच्या पात्रता परीक्षेकरिता २०१६ चे अर्ज हे आॅनलाईन पद्धतीने एमकेसीएलच्या साईटवरुन आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये भरण्यात आले. त्यामध्ये मोबाईल नंबरची सुद्धा नोंदणी करण्यात आली. त्यामुळे १९ आॅगस्टला निशांत राऊत या विद्यार्थ्याला एमकेसीएलच्या साईटवरुन ओळखपत्र डाऊनलोड करण्याचा मॅसेज आला. यावर निशांतने ओळखपज्ञ डाऊनलोड केले असता त्यामध्ये आॅनलाईन परीक्षेची वेळ ही ४.३० ए.एम. ते ६ ए.एम. ही होती. एकदम सकाळची वेळ पाहून विद्यार्थी आश्चर्यचकीत झाला. त्यामुळे ओळखपत्राच्या पानावरच विद्यापीठाचा लॅन्डलाईन नंबर असल्यामुळे विद्यार्थ्याने फोन लावला परंतु फोन कुणीही उचलला नाही. विद्यार्थ्याला वाटले की पीएचडीचा आॅनलाईन पेपर आहे आणि वेळापत्रकानुसार परीक्षा ही मात्र तीन म्हणजे १, २ आणि ३ सप्टेंबर या दिवसांमध्येच संपवायची अ सल्यामुळे कदाचित सकाळी साडेचार वाजता पेपरची वेळ असू शकते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे विद्यापीठाद्वारे ऐवढी मोठी चुक होऊच शकत नाही, अशा विद्यार्थ्याचा गैरसमज झाला.
काही दिवस लोटल्यानंतर विद्यार्थ्याने काही अनुभवी प्राध्यापकांना या वेळे संदर्भात विचारले असता आगळे-वेगळे उत्तर मिळाल्याने विद्यार्थ्याच्या मनात वेळेसंदर्भात शंका- कुशंका निर्माण झाली. यावर त्याने नागपूर येथील मित्राशी संपर्क साधून विद्यापीठात जाण्याकरिता सांगितले. विद्यापीठात गेल्यानंतर मात्र हा प्रकार उघडकीस आला व वेळेमध्ये ४.३० पी.एम. ते ६ पी.एम. करण्यात आले. विशेष म्हणजे ओळखपत्र हाती आल्यानंतर निशांत राऊत या विद्यार्थ्याने पेपरला सकाळी उपस्थित राहण्याची शारीरिक व मानसिक तयारी केलेली होती. परंतु विद्यार्थ्यांच्या प्रसंगावधानाने ही बाब पेपरच्या पूर्वी दुरुस्त करण्यात आली. मात्र किती विद्यार्थी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या या अफलातून कारभाराचे शिकार झाले याचा पत्ता नाही. (वार्ताहर)