तेंदूपत्ता संकलन केंद्रावर फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:21 AM2021-05-31T04:21:49+5:302021-05-31T04:21:49+5:30
केशोरी : परिसरातील अनेक गावांमध्ये तेंदूपत्ता संकलनाचे केंद्र सुरू आहे. दररोज सायंकाळी या केंद्रांवर तेंदूपत्ता संकलन करताना फिजिकल डिस्टन्सिंगचा ...
केशोरी : परिसरातील अनेक गावांमध्ये तेंदूपत्ता संकलनाचे केंद्र सुरू आहे. दररोज सायंकाळी या केंद्रांवर तेंदूपत्ता संकलन करताना फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा होताना दिसत आहे. यामुळे परिसरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. याकडे वनविभागाने लक्ष देऊन फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यासंबंधी सूचना द्याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
परिसरातील केळवद, करांडली, गोठणगाव, बोंडगाव, सुरबन, वारव्ही, चिचोली या गावांत वनविभागाच्या नियंत्रणाखाली खासगी कंत्राटदारांनी तेंदूपत्ता संकलन केंद्र सुरू केले आहेत. जिल्ह्यासह अर्जुनी-मोरगाव तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता. गरीब लोकांना रोजगार मिळावा म्हणून तेंदूपत्ता संकलनाचे कामे सुरू करण्यात आले. ही लोकांसाठी अत्यंत जमेची बाजू असली तरीही कोरोना महामारीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तेंदूपत्ता संकलन केंद्रावर सायंकाळी तेंदूपत्त्याचे पुडे जमा करताना फिजिकल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
शासनाने तेंदूपत्ता संकलन केंद्र सुरू करताना कोरोनासंदर्भातील नियम पाळण्याच्या अटीवर खासगी कंत्राटदारांना तेंदूपत्ता संकलन केंद्र सुरू करण्याची परवानगी दिली आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी वनविभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. वनविभागातील कर्मचाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या परिसरात तेंदूपत्ता संकलनाचे केंद्र सुरू झाल्याने अनेक गोरगरीब लोकांना रोजगार मिळाला असून, याबरोबर कोरोना संसर्गावर आळा घालण्यासाठी जे नियम घालून दिले आहेत. त्या नियमांची अंमलबजावणी करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. तेंदूपत्ता संकलन केंद्रावर सॅनिटायझर आणि मास्कची व्यवस्था यासह अधिक लोकांची गर्दी होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. परंतु, कोणत्याच तेंदूपत्ता संकलन केंद्रावर ही सुविधा दिसून आली नाही. उलट फिजिकल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले. कोरोना नियमांकडे दुर्लक्ष करून तेंदूपत्ता संकलनाचे कार्य केले जात आहे. याकडे वनविभागातील अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तेंदूपत्ता संकलन केंद्रावर कोरोना नियमांचे पालन करण्यासंबंधीच्या सूचना निर्गमित कराव्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.