लसीकरण केंद्रावर फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:28 AM2021-05-16T04:28:30+5:302021-05-16T04:28:30+5:30
तिरोडा : कोरोना प्रतिबंधक लस ‘कोविशिल्ड’ घेण्यासाठी नोंदणी करून नागरिक उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे पोहोचले. मात्र, रुग्णालयात ...
तिरोडा : कोरोना प्रतिबंधक लस ‘कोविशिल्ड’ घेण्यासाठी नोंदणी करून नागरिक उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे पोहोचले. मात्र, रुग्णालयात चिठ्ठी काढण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने नागरिकांची खिडकीवर एकच गर्दी झाली. एकीकडे फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्याचे शासकीय निर्देश असताना शासकीय रुग्णालयातच त्याला हरताळ फासला जात आहे. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनीसुद्धा याकडे दुर्लक्षच केले.
विशेष म्हणजे, नोंदणी खिडकीवर पुरुष व महिलांसह वृद्धांसाठी वेगळ्या रांगेचे फलक लावण्यात आले. हे फलक नावापुरतेच आहेत. नोंदणी खिडकीवरच उशीर लागत असल्याने वयोवृद्धांसह नागरिकांना दीड ते दोन तास ताटकळत राहावे लागले. उल्लेखनीय म्हणजे, यावेळी एक-दोन व्यक्तींना भोवळसुद्धा आली. रुग्णालयातील या अव्यवस्थेकडे वैद्यकीय अधीक्षकांचे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. जिल्हा प्रशासन फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी आवाहन करून कोविड प्रतिबंधासाठी अविरत प्रयत्नरत असताना खुद्द शासकीय रुग्णालयातच त्याचा फज्जा उडविण्यात येत आहे.