भौतिकशास्त्राच्या पेपरफुटीचा इन्कार, मात्र दिवसभर यंत्रणेची धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 11:06 IST2025-02-19T11:05:28+5:302025-02-19T11:06:30+5:30

Gondia : शिक्षण उपसंचालक देवरीत; सचिवांनी घेतली व्हीसी

Physics paper leak denied, but system continues to run all day | भौतिकशास्त्राच्या पेपरफुटीचा इन्कार, मात्र दिवसभर यंत्रणेची धावपळ

Physics paper leak denied, but system continues to run all day

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया/देवरी :
देवरी शहरातील एका नामांकित शाळेतील परीक्षा केंद्रावर सोमवारी (दि. १७) भौतिकशास्त्राचा पेपर फुटल्याचे वृत्त 'लोकमत' मध्ये प्रकाशित होताच शिक्षण विभागाने असा कुठलाच प्रकार घडला नसल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला; पण काहीच घडले नाही तर शिक्षण उपसंचालक हे तातडीने मंगळवारी (दि. १८) देवरी येथे का पोहोचले, सायंकाळी विभागीय सचिवांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा का घेतला, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.


सोमवारी बारावीचा भौतिकशास्त्राच्या पेपरच्यावेळी देवरी येथील एका परीक्षा केंद्रावर कॉपी सुरू असल्याचे पुढे आले. एका विद्यार्थ्याने हा सर्व प्रकार घरी येऊन आपल्या पालकांना सांगितल्यानंतर बिंग फुटले. देवरी येथील एका जागरूक नागरिकाने नागपूर येथील परीक्षा मंडळाच्या संचालक आणि सचिवांकडे याबाबत दूरध्वनीवरून तक्रार केली; पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र, 'लोकमत'च्या वृत्तानंतर शिक्षण विभागाने तातडीने दखल घेतली. मंगळवारी (दि. १८) शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांनी देवरीतील परीक्षा केंद्राला भेट देऊन संपूर्ण घटनाक्रम समजून घेतला. पेपरफुटीचा प्रकार घडला का, याबाबत केंद्रावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करून बयाणे नोंदवण्यात आली. गोंदिया येथील शिक्षण विभागानेही संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आवश्यक निर्देश दिले.


देवरी तालुक्यातील तीन पैकी एकाही परीक्षा केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. भौतिकशास्त्राचा पेपरफुटीच्या बातमीत कुठलेही तथ्य आढळून आले नसल्याचा दावा जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.


परीक्षा केंद्रांना नियमित भेटी द्या
या प्रकारानंतर सर्व भरारी पथकांना आणि अधिकाऱ्यांना परीक्षा केंद्रांना नियमित भेटी देण्याचे आणि परीक्षेदरम्यान मुख्यालय सोडू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.


विभागीय सचिवांनी घेतला आढावा

  • नागपूर विभागीय बोर्डाचे विभागीय सचिव यांनी मंगळवारी संध्याकाळी ५ वाजता शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसह परीक्षा केंद्रप्रमुख आणि इतर संबंधितांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली.
  • या बैठकीत देवरीतील प्रकरण गांभीर्याने घेत कठोर सूचना देण्यात आल्या. सायंकाळी ७ वाजता राज्य शिक्षण मंडळाने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारा या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेऊन आवश्यक सूचना केल्याची माहिती आहे.


"मी स्वतः देवरी येथील परीक्षा केंद्राला भेट देऊन संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली. चौकशीदरम्यान पेपरफुटीचा अथवा मोठ्या प्रमाणात कॉपी झाल्याचा कुठलाच प्रकार समोर आलेला नाही. शिक्षण विभाग परीक्षा पारदर्शक आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच, परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत."
- उल्हास नरड, शिक्षण उपसंचालक, नागपूर विभाग


 

Web Title: Physics paper leak denied, but system continues to run all day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.