थातूर-मातूर सफाईचे चित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 05:00 AM2020-07-07T05:00:00+5:302020-07-07T05:00:46+5:30
सिव्हील लाईन्स कारा चौक परिसरातून सुरू होत असलेल्या या प्रभागात मनोहर चौक, प्रभात टॉकीज चौक, गांधी पुतळा, घाट रोड, ठाकूर मोहल्ला येतो. प्रभागात रस्त्यांचे जाळे दिसले. मात्र स्वच्छतेचा अभाव दिसून आला. सांडपाणी व गाळाने नाल्या बरबटलेल्या आढळल्या. यातून प्रभागात स्वच्छतेचा अभाव जाणविला तर काही नागरिकांनीही बोलून दाखविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील काही भागासह बाजार भागाला लागून असलेल्या प्रभाग क्रमांक ७ चे क्रांती जायस्वाल व शिलू ठाकूर नगर परिषद सदस्य आहेत. सिव्हील लाईन्स कारा चौक परिसरातून सुरू होत असलेल्या या प्रभागात मनोहर चौक, प्रभात टॉकीज चौक, गांधी पुतळा, घाट रोड, ठाकूर मोहल्ला येतो. प्रभागात रस्त्यांचे जाळे दिसले. मात्र स्वच्छतेचा अभाव दिसून आला. सांडपाणी व गाळाने नाल्या बरबटलेल्या आढळल्या. यातून प्रभागात स्वच्छतेचा अभाव जाणविला तर काही नागरिकांनीही बोलून दाखविले.
सिव्हील लाईन्स परिसरातील काका चौकातून प्रभागाची सुरूवात झाली असून पुढे मनोहर चौक परिसरात सांडपाणी व गाळाने बरबटलेल्या नाल्या दिसल्या. त्यांच्या शेजारी काढण्यात आलेले गाळ व कचऱ्याचे ढिगार दिसले.
परिसरातील नागरिकांनी यावर नाराजी व्यक्त करीत माणसं बोलावून सफाई करावी लागत असल्याचे सांगितले. मनोहर चौकात मोठा खड्डा तयार झाला असून पाणी साचलेले दिसले व त्यातूनच नागरिकांना ये-जा करावी लागत आहे. पुढे मनोहर चौकातून प्रभात टॉकीज होत गांधी पुतळापर्यंत मुख्य मार्ग असून हा परिसर बाजार भागातच येतो.
पुढे घाट रोड परिसरातील जगन्नाथ मंदिर व ठाकूर मोहल्लात जावून बघितले असता येथे नाल्यांमध्ये गवत उगवलेले दिसले. यातून या नाल्यांच्या सफाईचा प्रश्न पडला. विशेष म्हणजे, मान्सून बघताही या नाल्यांची सफाई झालेली नसल्याचे दिसले. परिसरातील नागरिकांनी नगरसेवक येतात असे सांगीतले. कचरागाडी दररोज कचरा संकलनासाठी येते असेही सांगीतले. मात्र झाडू लावणारे येत नसल्याचेही बोलून दाखविले. बाजार भागासह सिव्हील लाईन्स परिसरातील जुना रहिवासी भाग असल्याने येथे रस्ते व नाल्यांचे जाळे दिसले. मात्र स्वच्छतेचा अभाव ही जाणवला.
नागरिकांनी व्यक्त केली नाराजी
मनोहर चौक ते काका चौक परिसरातील काही नागरिकांनी बरबटलेल्या नाल्यांची स्थिती दाखवून स्वच्छतेची समस्या व्यक्त केली. एवढेच नव्हे तर माणसं बोलावून स्वत: सफाई करवून घ्यावी लागते असेही सांगीतले. यातून प्रभागातील स्वच्छतेचे चित्र दाखवून देत आपली नाराजी व्यक्त केली.
प्रभागातील कचराकुंड्या तुडुंब
प्रभागातील काही ठिकाणच्या कचराकुंड्या कचऱ्याने तुडुंब भरल्या असल्याचे दिसले. यातून या कचराकुंड्यातील कचऱ्याची उचल किती दिवसांपासून झालेली नाही असा प्रश्न पडला. पावसाळा असल्याने प्रभागात आता खऱ्या अर्थाने स्वच्छतेची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पाईप आहे पण नळ तुटलेले
जगन्नाथ मंदिरपासून काही अंतर पुढे पाण्यासाठी असलेले सार्वजनिक नळ दिसून आले. मात्र येथे पाईपलाईन दिसली. त्यावर लागलेले नळ तुटलेले दिसले. अशात या नळाला पाणी आल्यास पाण्याचा नासाडी होणार यात शंका नाही. मात्र या प्रकाराकडे नागरिक व नगरसेवक दोघांचेही दुर्लक्ष दिसून आले.