एका चुकीमुळे कोट्यवधीचा पूल ‘शो पीस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 09:25 PM2018-07-26T21:25:17+5:302018-07-26T21:26:38+5:30

शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाण पूल जीर्ण व अरुंद असल्याने त्याला पर्याय म्हणून चार वर्षांपूर्वी ५१ कोटी रुपये खर्च करुन नवीन उड्डाण पूल तयार करण्यात आला. मात्र पूल तयार करताना पुलाच्या दोन्ही बाजुला पादचारी पूल तयार केला नाही.

'Piece of Peace' | एका चुकीमुळे कोट्यवधीचा पूल ‘शो पीस’

एका चुकीमुळे कोट्यवधीचा पूल ‘शो पीस’

Next
ठळक मुद्देयंत्रणेवर प्रश्नचिन्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष भोवणार, पुलावर अपघाताची शक्यता,

अंकुश गुंडावार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाण पूल जीर्ण व अरुंद असल्याने त्याला पर्याय म्हणून चार वर्षांपूर्वी ५१ कोटी रुपये खर्च करुन नवीन उड्डाण पूल तयार करण्यात आला. मात्र पूल तयार करताना पुलाच्या दोन्ही बाजुला पादचारी पूल तयार केला नाही. तर पुलाचा उतार चुकीचा ठेवल्याने या पुलावरील जड वाहतूक बंद करण्याची पाळी प्रशासनावर आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
गोंदिया-बालाघाट मार्गावर ६६ वर्षांपूर्वी उड्डाण पूल तयार करण्यात आला. या पुलाचा काही भाग रेल्वे ट्रॅक परिसरात असल्याने पुलाचे काही बांधकाम रेल्वे विभागाने केले होते. मात्र आता जुना उड्डाण जीर्ण झाला असून तो केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या पुलावरील वाहतूक त्वरीत करावी. असे पत्र आठ दिवसांपूर्वीच रेल्वे विभागाने जिल्हा प्रशासनाने दिले. यानंतर शहरावासीयांमध्ये खळबळ उडाली. मात्र नवीन उड्डाण पूल तयार असल्याने फारशी अडचण जाणवणार नाही, असे शहरवासीयांना वाटत होते. पण, चार वर्षांपूर्वी तयार केलेला नवीन उड्डाण पूल सदोष असल्याने या पुलावरुन जड वाहतूक सुरू ठेवणे शक्य नसल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक नियंत्रण विभागाने चार दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. त्यामुळे ५१ कोटी रुपये खर्च करुन तयार केलेल्या उड्डाण पूल सदोष का असा प्रश्न सर्वांनाच पडला.
विशेष म्हणजे नवीन उड्डाण पुलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात आले. यासाठी तज्ञ इंजिनियरची चम्मू कार्यरत होती. मात्र यानंतरही उड्डाणपुलाचे बांधकाम सदोष करण्यात आले. पुलाचे डिझाईन व पुलाच्या दोन्ही बाजुला पादचारी पुलासाठी जागा सोडण्यात आली नाही.
त्यामुळे पुलावरुन पायी जाणाऱ्या नागरिकांना पुलाच्या मधातून चालत जावे लागते. परिणामी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर पुलाचा उतार सुध्दा अधिक असल्याने एखाद्या वेळेस वाहनाचे ब्रेक फेल झाल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा धोका पत्थकारण्यास प्रशासन तयार नाही. त्यामुळेच या तीन्ही विभागाने आपल्या अहवालात जुना उड्डाण पूर्णपणे बंद तर नवीन उड्डाण पुलावर जड वाहनाना प्रवेश देऊ नये असे म्हटले आहे. त्यामुळे यावर मार्ग काढण्यासाठी शहरातील जडवाहतूक बायपास मार्गे वळविण्याचा निर्णय घेण्यात आला. पण कोट्यवधी रुपये खर्च करुन तयार केलेला उड्डाण पूल केवळ एका छोट्याशा चुकीमुळे ‘शो पीस ठरणार आहे. यंत्रणेच्या चुकीचा फटका शहरवासीयांना सहन करावा लागणार आहे.
यंत्रणेला घाई करणे भोवले
गोंदिया-बालाघाट मार्गावर तयार करण्यात आलेल्या नवीन उड्डाण पुलाचे लोकार्पण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यंत्रणेवर तेव्हा दबाव टाकण्यात आल्याचे बोलल्या जाते.परिणामी याच घाईमुळे पुलाचे तांत्रिकदृष्टया बांधकाम चुकल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे पुलाच्या दोन्ही बाजुला पायी जाणाऱ्या नागरिकांसाठी जागा न सोडण्याची छोटीशी बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लक्षात आली नाही. त्यामुळे हा पूल जडवाहतुकीसाठी सुरू ठेवणे म्हणजे धोका पत्थकारण्यासारखे झाले आहे.
पूल पाडण्यासाठी एजन्सीचा शोध
रेल्वे विभागाने जिल्हा प्रशासनाला जुना उड्डाणपूल त्वरीत पाडण्याचे पत्र दिले आहे. पूल पाडण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याचे सांगितले. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने जुना उड्डाणपूल पाडण्यासाठी एजन्सीचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. नागपूर येथील छत्रपती चौकातील उड्डाण पूल पाडणाऱ्या एजन्सीकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती आहे.
तात्पुरती वाहतूक सुरू ठेवण्याची मागणी
जिल्हा प्रशासनाने जुन्या उड्डाण पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद न करता या पुलावरुन दुचाकी आणि लहान वाहनाची वाहतूक सुरू ठेवावी, अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडे केली. मात्र यावर रेल्वे प्रशासनाने कुठलेच उत्तर दिले नसल्याची माहिती.

Web Title: 'Piece of Peace'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.