शेंगा पोखरणाऱ्या अळींचे तुरीवर आक्रमण
By admin | Published: January 9, 2016 02:15 AM2016-01-09T02:15:30+5:302016-01-09T02:15:30+5:30
सद्यस्थितीत तुर पिकावर कळी व फूल गळतीच्या अनेक समस्या आहेत. त्यात नैसर्गिक कारणांशिवाय पाण्याचा ताण,
कृषी विभाग झाला सज्ज : आठवड्यातून एकदा हेक्टरी २० ते २४ झाडांचे निरीक्षण गरजेचे
गोंदिया : सद्यस्थितीत तुर पिकावर कळी व फूल गळतीच्या अनेक समस्या आहेत. त्यात नैसर्गिक कारणांशिवाय पाण्याचा ताण, अन्नद्रव्यांची कमतरता व अळींचा प्रादुर्भाव ही प्रमुख कारणे आहेत. अळींच्या आक्रमनामुळे तुर पिकांवर संकट ओढवले असून शेतकरी पुन्हा हवालदिल झाला आहे. कृषी विभागही शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी सज्ज झाला आहे.
पीक फुलोऱ्यावर येण्यापूर्वी पाने गुंडाळणारी अळी, तर पीक कळी, फुलोरा व शेंगा लागलेल्या अवस्थेत शेंगा पोखरणारी हिरवी अळी (घाटे अळी), पिसारी पतंग व शेंगमाशीच्या अळीचा प्रादुर्भाव नुकसानदायक ठरतो. त्यांच्या नियंत्रणाकडे लक्ष देण्याकरिता आठवड्यातून किमान एकदा हेक्टरी २० ते २४ झाडांचे सर्वेक्षण स्वरूपात निरीक्षण करणे फार गरजेचे आहे. त्यामुळे किडीचा अंदाज लक्षात घेवून उपाययोजना करणे सोयीचे होते.
तुर पिकामध्ये प्रामुख्याने तीन प्रकारच्या अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. यात शेंगा पोखरणाऱ्या हिरव्या अळीस घाटेअळी, हिरवी अमेरिकन बोंड अळी आदी नावांनी संबोधण्यात येते. ही कीड बहुवनस्पती भक्षी आहे. मादी पतंग कोवळी पाने, कळ्या व शेंगावर अंडी घालते. अंड्यातून निघालेल्या अळ्या तुरीची कोवळी पाने, कळ्या व फुले खावून नुकसान करतात. पूर्ण वाढ झालेली अळी अनियमित आकाराचे मोठे छिद्र पाडून शेंगांच्या आत शिरते व शेंगातील दाणे खावून टाकते. त्यावेळी तिचे अर्धे शरीर शेंगाबाहेर राहते. अशाप्रकारे एक अळी सहा ते १६ तुरीच्या शेंगांचे नुकसान करते.
पिसारीपतंग ही दुसऱ्या प्रकारची अळी असून या अळीच्या अंगावर सूक्ष्म काटे व केश असतात. अळी शेंगावरील साल खरडून छिद्र करते व बाहेर राहून दाणे पोखरते.
तिसऱ्या प्रकारची अळी म्हणजे शेंगमाशी. या किडीचा तुर पिकांचे नुकसान करण्यात आशिया खंडात घाटे अळीनंतर दुसरा क्रमांक लागतो. या माशीची अळी बारिक गुळगुळीत व पांढऱ्या रंगाचे असून तिला पाय नसतात. ही अळी शेंगातील दाणे अर्धवट कुरतडून खाते. त्यामुळे दाण्याची मुकणी होते.
कृषी विभागाच्या वतीने तुर पीक वाचविण्यासाठी शेतकरी बांधवांना विविध प्रकारे मार्गदर्शन करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
किडींचे एकात्मिक व्यवस्थापन
१. शेतामध्ये हेक्टरी २० पक्षीथांबे उभारावेत. त्यामुळे अळ्यांचे परभक्षक असलेले पक्षी अळ्या वेचण्याचे काम करतात. २. तुरीच्या झाडाखाली पोते टाकून झाड हलवावे. त्यामुळे झाडावरील अळ्या पोत्यावर पडतील, त्या गोळा करून नष्ट कराव्यात. ३. हेक्टरी २०-२४ कामगंध सापळे पिकात उभारावेत. त्यामुळे किडीचे काही प्रमाणात नियंत्रण करण्यास मदत होते. ४. गुंडाळलेली पाने वेचून नष्ट करावी. ५. वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा वापर, किडींना झाडावर अंडी घालण्यापासून रोखण्याकरिता पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. त्यामुळे फार मदत होते.
शेवटचा पर्याय
किडींच्या एकात्मिक व्यवस्थापन तंत्राचा अवलंब करूनही शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव आढळून आल्यास व किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यास शेवटच्या पर्यायाचा अवलंब करावा. यात गरजेनुसार पहिली फवारणी करावी. यात ५० टक्के झाडांना फुले आल्यानंतर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांसाठी इमामोक्टीन बेन्जोएट पाच टक्के, एसजी ४.४ टक्के ग्राम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. यानंतर गरज भासल्यास दुसरी फवारणी करावी. यात १५ दिवसांनी लॅबडा सायहॅलोथ्रीन पाच टक्के, प्रवाही १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. तुरीसारख्या मोठ्या पिकांमध्ये पिकाच्या अवस्थेनुसार एकरी २५० ते ३०० लिटर पाण्याचा वापर करावा.