दुप्पट पैसे घेण्यावरून यात्रेकरूंचा विरोध ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:45 AM2021-02-23T04:45:10+5:302021-02-23T04:45:10+5:30
गोंदिया : गोंदिया ते नागपूरकरिता लोकल रेल्वेगाडी आज (दि. २२) पासून सुरू झाली. मात्र प्रवाशांकडून तिकिटाचे दुप्पट पैसे घेण्यात ...
गोंदिया : गोंदिया ते नागपूरकरिता लोकल रेल्वेगाडी आज (दि. २२) पासून सुरू झाली. मात्र प्रवाशांकडून तिकिटाचे दुप्पट पैसे घेण्यात आल्याने रेल्वे प्रशासनाच्या विरोधात प्रवाशांनी रोष व्यक्त केला.
कोरोनाच्या संसर्गामुळे मागील महिन्यांपासून लोकल गाडी बंद होती. त्यानंतर आता परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने रेल्वे विभागाने काही गाड्या सुरू केल्या आहेत. मात्र तिकिटाचे दर दुप्पट केल्याने याचा भुर्दंड प्रवाशांना बसत आहे. कोरोनामुळे उद्याेग धंदे सर्वच ठप्प असल्याने अनेकांचा रोजगार हिरावला आहे. काही जण उदरनिर्वाहासाठी छोटे-मोठे उद्योग करू लागले. रोजगार बंद झाल्याने आर्थिक स्थिती खिळखिळी झालेले लोक लोकल गाडीचा आधार घेऊन प्रवास करू लागले. परंतु तिकिटात दुपटीने वाढ केल्यामुळे लोकांध्ये तीव्र असंतोष आहे. प्रवाशांचा विचार करता रेल्वे विभागाने गोंदिया-नागपूर लोकल गाडीचे तिकिटाचे दर पूर्ववत करण्याची मागणी केली. तसेच गोंदिया शहरातील रेल्वेस्थानकाचे दोन्ही पूल बंद असल्याने प्रवाशांना लांब अंतर कापून रेल्वेस्थानकावर यावे लागते. त्यामुळे हे दोन्ही पूल प्रवाशांसाठी सुरू करण्यात यावे, अशी मागणी केली. तब्बल ११ महिन्यानंतर लोकल गाडी सुरू झाल्याचा आनंद लोकांमध्ये होता. तर दुसरीकडे तिकीट दुपटीने वाढल्याने त्या संदर्भात असंतोषही होता.