ओवारा येथे पाण्यासाठी पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:28 AM2021-04-18T04:28:15+5:302021-04-18T04:28:15+5:30
देवरी : तालुक्यातील महत्त्वपूर्ण ओवारा प्रकल्पातीलच नागरिक मागील एक महिन्यापासून पाण्यासाठी भटकंती करत असल्याची बाब समोर आली आहे. येथील ...
देवरी : तालुक्यातील महत्त्वपूर्ण ओवारा प्रकल्पातीलच नागरिक मागील एक महिन्यापासून पाण्यासाठी भटकंती करत असल्याची बाब समोर आली आहे. येथील नागरिकांना थेंब-थेंब पाण्यासाठी भटकंती करून दूरवरून पाणी आणावे लागत आहे. यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. याला ग्रामपंचायत प्रशासनच कारणीभूत असल्याचा आरोप येथील गावकरी करीत आहेत.
तालुक्यातील ओवारा प्रकल्पातून देवरी व आमगाव तालुक्याला सिंचनाकरिता पाणी उपलब्ध करण्यात येते; परंतु येथील ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षतेमुळे स्थानिक नागरिकांना दररोज पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. येथील पाणीपुरवठा योजना मागील एक महिन्यापासून ठप्प पडली आहे. अधिकांश सार्वजनिक हातपंप नादुरुस्त असून, जे सुरू आहेत, त्यातून दूषित पाणी येत आहे, तसेच सार्वजनिक विहिरीचीही स्थिती बिकट असून, दुर्गंधीयुक्त, गढूळ व दूषित पाणी येते. ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिवांच्या दुर्लक्षपणामुळे गावात पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून, नाहकच त्रास सहन करावा लागत आहे. मागील एक महिन्यापासून गावात पाण्याची समस्या आहे. गावात पाणी शुद्धीकरण करण्याची कोणतीही व्यवस्था नाही. गावातील नागरिकांना सतत गढूळ, अशुद्ध आणि आरोग्याला नुकसान करणारे पाणी पुरविण्यात येत असून, येथील पाणीपुरवठा एक महिन्यापासून बंदच आहे. ओवारा येथील पाण्याच्या समस्यांबाबत त्रस्त गावकऱ्यांनी यासंबंधी जिल्हाधिकारी, पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे तक्रार केली आहे. तक्रारीत गावकऱ्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात यावी व समस्येपासून त्यांना मुक्त करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.