तलावाच्या नावे ‘मृत्यूचा खड्डा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2017 12:15 AM2017-06-22T00:15:10+5:302017-06-22T00:15:10+5:30
तिरोडा तालुक्यात राज्यातील सर्वात मोठा विद्युत पॉवर प्लांट आल्यानंतर तिरोडा तालुकावासीयांनी आनंद व्यक्त केला.
चुरडी गावालगत तयार : पिचिंग व चढण्या-उतरण्याची व्यवस्था नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
काचेवानी : तिरोडा तालुक्यात राज्यातील सर्वात मोठा विद्युत पॉवर प्लांट आल्यानंतर तिरोडा तालुकावासीयांनी आनंद व्यक्त केला. नागरिकांनी खुल्या मनाने प्लांटला सहकार्य केले. कोणतीही अडचण निर्माण होवू दिली नाही. मात्र आता प्लांटचे संचालक व तेथील अधिकाऱ्यांच्या अयोग्य धोरण व कार्यामुळे तिरोडावासी संतापले आहेत. चुरडी गावालगतच गाव तलावाच्या नावे तयार करण्यात आलेल्या ‘मृत्यूच्या खड्ड्या’मुळे नागरिक चांगलाच रोष व्यक्त करीत आहेत.
तिरोडा शहरालगत असलेल्या चुरडी गावाजवळ अदानी पॉवर फाऊंडेशनकडून १० ते १५ फूट खोलीचा गाव तलाव तयार करण्यात आला. हा तलाव नसून मृत्यूचा खड्डा असल्याचे नागरिक बोलतात. तलाव कोणत्या उद्देशाने तयार करण्यात आला, हे समजण्यासारखे दिसत नाही. जनावरे व गावातील नागरिकांसाठी अनुपयोगी असल्याचे समजते. मात्र त्यामुळे जीव धोक्यात येवून कधीही जीवितहानी घडू शकते.
पावसाळा सुरू झाला असून तलाव म्हणून भयंकर स्वरूपात खड्डा खोदून ठेवण्यात आला आहे. या तळ्याला पिचिंग करण्यात आले नाही. चढण्या-उतरण्यासाठी कोणतेही साधन ठेवण्यात आले नाही. जनावरे, माणसे, मुले आदी तळ्यात गेले तर बाहेर निघणार कसे? त्यांचा जीव वाचेल कसा? याबाबत कोणतीही काळजी घेण्यात आली नाही.
या भागातील मृदा ही कन्हारी (चिकन) असल्याने त्यात घसरून फसण्याचेच प्रमाण अधिक आहे. एकदा तळ्यात गेलेला बालक, तरूण, वृद्ध किंवा जनावर परतणार नाही, त्याचे केवळ मृतदेहच बाहेर येणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
ज्या ठिकाणी गाव तलाव तयार करण्यात आला, त्याला लागूनच १५ ते २० मीटर अंतरावर चुरडीच्या गरीब नागरिकांची घरे आहेत. या घरातील लहान मुलांसह जनावरांचे जीव चोवीस तास धोक्यात राहणार आहे. ग्रामपंचायत चुरडी व तालुका प्रशासनाने या बांधकामाची मंजुरी दिली कशी, ही आश्चर्याची बाब आहे.
पावसाळ्याचा जोरदार पाऊस बरसण्यापूर्वी तयार करण्यात आलेल्या या मृत्यूच्या खड्ड्याला (तलाव) चारही बाजूंनी सुरक्षा भिंत तयार करण्यात यावी. अन्यथा जनावरांसह माणसांची जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर कसलीही दुर्घटना घडली तर याची किंमत अदानी पॉवरला चुकविणे सहज होणार नाही, अशा इशारासुद्धा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
१२ एकर शेती बुडीत
पॉवर प्लांट तयार होईपर्यंत नागरिकांना व शेतकऱ्यांना कसातरी दिलासा देण्यात आला. काम पूर्णत्वाकडे असताना लोकप्रतिनिधी, नागरिक व अधिकाऱ्यांनी केलेल्या सहकार्याचा विसर कंपनीला पडला आहे. चुरडी येथील उदाराम जांभूळकर यांची १२ एकर शेती असून अदानी पॉवरने वरच्या बाजूला नवीन पाण्याचा तलाव तयार केला. त्यामुळे या तलावाचे पाणी सतत शेतात झिरपत (सिपेज) असते. पिकांना सतत पाणी असल्याने उत्पन्नात घट येते. तसेच धान कापणीला आल्यास पाणी भरले असल्याने कापण्याची समस्या निर्माण होते. यावर्षी शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने जांभूळकर कुटुंबाला माजी आ. दिलीप बन्सोड यांनी ३० हजार रूपयांची आर्थिक भरपाई मिळवून दिली आहे.
विकासाच्या नावे पिळवणूक
अदानी फाऊंडेशनने दत्तक घेतलेल्या गावात तसेच पुनर्वसन केलेल्या गावात शासनासोबत केलेल्या करारनाम्यात विविध सुविधा आहेत. त्या सुविधा देण्यास अदानी फाऊंडेशन अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विकास करण्याचे केवळ ढिंढोरे पिटले जात असून नागरिकांना सुविधा कमी तर सुविधेच्या नावावर अदानीचा पैसा हडप केला जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. अधिकाऱ्यांना खूश ठेवून नागरिकांची मात्र पिळवणूक केली जात असल्याचे नागरिकांनी सांगितले.