परमेश्वरापेक्षाही गुरूंच स्थान महत्त्वपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 06:00 AM2019-09-06T06:00:00+5:302019-09-06T06:00:23+5:30
जिल्हा परिषदेच्या स्व.यशवंतराव चव्हाण सभागृहात शिक्षक दिनानिमीत्त आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी त्या उद्घाटक म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ.राजा दयानिधी होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ‘गुरू गोविंद दोनो खडे किसके लागू पाय, बलहारी गुरू आपकी गोविंद जिन्हो बताय’परमेश्वराची ओळख करून देणाऱ्या गुरूंचे स्थान ईश्वराहूनही मोठे आहे. उद्याचे राष्ट्र घडविण्याची जबाबदारी ज्या शिक्षकांवर असते त्यांचे व्यक्तीमत्त्व अष्टपैलू असते.आपला आदर्श समाजापुढे ठेऊन ज्ञान देण्याचे पवित्र काम इमाने इतबारे करतात तेच गुरूजी आदर्श ठरतात,असे उदगार जि.प.अध्यक्ष सीमा मडावी यांनी काढले.
जिल्हा परिषदेच्या स्व.यशवंतराव चव्हाण सभागृहात शिक्षक दिनानिमीत्त आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी त्या उद्घाटक म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ.राजा दयानिधी होते.
या वेळी प्रामुख्याने जि.प.चे उपाध्यक्ष व अर्थ आणि बांधकाम सभापती अल्ताफ अकबर अली हमीद, शिक्षण सभापती रमेश अंबुले, महिला व बाल कल्याण सभापती लता दोनोडे, कृषी व पशूसंवर्धन सभापती शैलजा सोनवाने,समाज कल्याण सभापती विश्वजीत डोंगरे, जि.प.सदस्य उषा शहारे, प्रीती रामटेके, प्राथमिक शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कच्छवे,उपशिक्षणाधिकारी राजकुमार रामटेके, सुनील मांढरे उपस्थित होते. या वेळी प्राथमिक विभागातील पाच तर माध्यमिक विभागातील दोन अशा सात शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविन्यात आले. प्राथमिक विभागात गोंदिया तालुक्यातून जि.प.उच्च प्राथमिक शाळा कारंजा येथील मुनेश्वर तिलकचंद जैतवार,आमगाव तालुक्यातून जि.प.प्राथमिक शाळा बोरकन्हार येथील सहाय्यक शिक्षीका प्रभा ब्रिजलाल गायधने, देवरी तालुक्यातून जिल्हा परिषद वरिष्ट प्राथमिक शाळा इस्तारी येथील मंगलमूर्ती किसन सयाम, गोरेगाव तालुक्यातून जि.प.प्राथमिक शाळा सुकाटोला येथील परमानंद सेवकराम रहांगडाले, तिरोडा तालुक्यातून जि.प.वरिष्ट प्राथमिक शाळा नवेगावबांध येथील तेजलाल ब्रिजलाल भगत, माध्यमिक विभागातून देवरी तालुक्यातून जि.प.हायस्कूल ककोडी येथील लक्षमण छंदर आंदळे व अर्जुनी-मोरगाव तालुक्यातून जि.प.हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवेगावबांध येथील भास्कर कुसन मानापुरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. सोबत आठही तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावीतील ७० विद्यार्थ्यांना गुणवंत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन दिलीप बघेले, कुलदीपीका बोरकर यांनी केले तर आभार उपशिक्षणाधिकारी आर.पी.रामटेके यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने झाली.