गाळ काढण्याचे योग्य नियोजन करा
By admin | Published: May 18, 2017 12:16 AM2017-05-18T00:16:20+5:302017-05-18T00:16:20+5:30
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना जिल्ह्यातील शेतक ऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
राजकुमार बडोले : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचा आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना जिल्ह्यातील शेतक ऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. आपला जिल्हा हा तलावांचा आहे. प्रत्येक गावाच्या आजुबाजूला २ ते ४ तलाव आहे. अनेक वर्षापासून हे तलाव गाळाने भरले आहे. हा गाळ सुपीक असून खत म्हणून या गाळाची उपयुक्तता मोठी आहे. शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी गाळ उपयुक्त ठरणार असल्यामुळे गाळ काढण्याचे योग्य नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
सोमवारी (दि.१५) जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेचा आढावा घेतांना ते बोलत होते. सभेला आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पथाडे, उपजिल्हाधिकारी आर.टी.शिंदे, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.
पालकमंत्री बडोले म्हणाले, या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १०० हेक्टरच्या आतील सर्व माजी मालगुजारी तलावातील गाळ नियोजनातून काढून शेतकऱ्यांच्या शेतात टाकावा. मुरु म मिश्रीत गाळ रस्त्याच्या बाजूला टाकावा. या योजनेतून तलावाची पाणी साठवण क्षमता वाढली पाहिजे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत तर होईल. सोबत रब्बीच्या सिंचनासाठी पाण्याचा वापर करता येईल. ३१ मे पर्यंत गाळ काढण्याचा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात यावा. पाण्याची साठवण क्षमता वाढविण्यासोबत शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी ही योजना मोठी संजीवनी देणारी आहे. प्रत्येक तालुक्यातून प्रत्येकी ५० तलावातून गाळ काढण्याचे नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावाच्या दुरु स्तीचा कार्यक्र म यापूर्वी हाती घेण्यात आला असल्याचे सांगून नामदार बडोले पुढे म्हणाले, तलावांच्या कालव्यांच्या बळकटीकरणाचा कार्यक्र म हाती घेण्यात यावा, त्यामुळे शेतकऱ्यांना योग्यप्रकारे पाण्याची उपलब्धता होण्यास मदत होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी काळे म्हणाले, या योजनेअंतर्गत यंत्रणांनी जास्तीत जास्त गाळ काढून त्या गाळाचे महत्व शेतकरऱ्यांना पटवून देवून तो गाळ जास्तीत जास्त शेतकरी शेतात टाकतील यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे. हा गाळ शेतात टाकल्यामुळे पुढील वर्षीपासून शेतीची उत्पादकता निश्चित वाढलेली असेल. जवळपास जिल्ह्यातील १८०० तलावातील गाळ काढण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील १०० हेक्टरच्या आतील तलावातील गाळ काढण्याचे नियोजन करण्यात आल्याचे कार्यकारी अभियंता पथाडे यांनी सांगितले. सभेला सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता, कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.