'त्याने' स्वत:च्या घरीच रचला चोरीचा डाव; स्थानिक गुन्हे शाखेने 'असा' केला उलगडा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 03:58 PM2023-01-11T15:58:54+5:302023-01-11T16:11:14+5:30
गोरेगाव येथील प्रकरणात ८९ हजारांचा माल जप्त
गोंदिया : स्वत:च्या घरीच चोरी करून पोलिसांत तक्रार देणाऱ्या चोरट्याचा डाव स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या चार तासांत उघडा पाडला. गोरेगाव येथील त्रिमूर्ती चौकातील हे प्रकरण असून पोलिसांनी तक्रारदार आरोपीस अटक करीत ८९ हजार ३१० रुपयांचा माल जप्त केला आहे.
गोरेगाव शहरातील त्रिमूर्ती चौक येथील रहिवासी रवींद्र कपूरचंद रहांगडाले यांनी रविवारी (दि.८) रात्री तकार दिली की, त्यांच्या घरातील सर्व सदस्य राधाकृष्ण मंदिरात महाप्रसादाकरिता गेले असता अज्ञात चोरांनी सोन्याचे दागिने व नगदी असा एक लाख ३० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. यावरून अज्ञात विरुद्ध गोरेगाव पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विजय शिंदे, उपनि. सायकर, जीवन पाटील, हवालदार बिसेन, चालक बंजार करीत असताना त्यांनी घटनास्थळास भेट देऊन आजूबाजूचा परिसर व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यात तक्रारदार रवींद्र रहांगडाले हे त्यादरम्यान घरी येऊन साधारण २० मिनिटे थांबले असल्याचे प्रथमदर्शी दिसून आले.
यावरून तक्रारदार रवींद्र रहांगडाले याला गुन्ह्याबाबत विचारपूस करून सखोल चौकशी केली असता त्यांनी कर्ज बाजारी झाल्याने स्वतःच्याच घरी चोरी केल्याची कबुली दिली. त्यास गुन्ह्यासंबंधाने ताब्यात घेऊन गुन्ह्यातील मुद्देमालाबाबत विचारणा केली असता स्वतः ८९ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल काढून दिल्याने हस्तगत करून गुन्ह्याच्या अनुषंगाने जप्त करण्यात आला.