१०० फूट खोल दरीतून गोळा केले विमानाचे अवशेष; चौकशीसाठी मुंबईहून आलेली चमू परतली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 01:02 PM2023-03-22T13:02:14+5:302023-03-22T13:02:31+5:30
लवकरच देणार अहवाल
गोंदिया : मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील किरणापूरच्या भक्कूटोला जंगलात झालेल्या शिकाऊ विमानाच्याअपघाताची चौकशी करण्यासाठी मुंबईहून आलेल्या तीन सदस्यीय तपास पथकाने सोमवारी आणि मंगळवारी घटनास्थळी जाऊन घटनेबाबत पुरावे आणि माहिती गोळा केली आहे.
डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन (डीजीसीए) मुंबई यांच्या चमूने १०० फूट खोल दरीत विखुरलेल्या विमानाच्या अवशेषातून आवश्यक उपकरणे, रीडिंग बॉक्स, कॉकपिटमधील सिग्नल आदी माहिती गोळा केली. तपासाचा अहवाल तीन ते चार दिवसात येऊ शकतो, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. बिरसी विमानतळाचे व्यवस्थापक शफिक शाह यांनी सांगितले की, टीम घटनास्थळी पोहोचली आहे.
विमानाच्या उड्डाणाची दिशा, अपघातापूर्वी त्याचा वेग, झाड किंवा खडकावर आदळल्याचा आघात इत्यादींचे मूल्यांकन केले आहे. वाचन बॉक्स सुरक्षित असल्यास, शिकाऊ विमानाच्या शेवटच्या क्षणी वेगाची माहिती असलेले, डेटा रेकॉर्डर जमा केले आहेत. याच सर्व गोष्टींची चाचपणी करून हा अपघात नेमका कसा झाला, याचा निकर्ष काढण्यात येणार असल्याची माहिती आहे.
वैमानिकांच्या संभाषणाची तपासणी होणार
कागदपत्रे, घटनास्थळी असलेले पुरावे आणि वैमानिक आणि प्रशिक्षणार्थी वैमानिक यांच्यातील संभाषणाची नोंद असलेल्या ब्लॅक बॉक्सची तपासणी केल्यानंतरच अपघाताची कारणे स्पष्ट होणार आहेत. घटनास्थळावरून माहिती गोळा करून तपास पथक मुंबईला परत रवाना झाले आहे. या समितीच्या अहवालानंतरच विमानाचा अपघात नेमका कसा झाला, हे स्पष्ट होणार आहे.