पावसाअभावी रोवण्या बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 05:00 AM2020-07-19T05:00:00+5:302020-07-19T05:00:46+5:30
तालुक्यात ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे त्यांचे रोवणीचे काम सुरु आहे. पण ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाचे साधन नाही किंवा वरथेंबी जमीन आहे त्या शेतकºयांच्या जमिनीमध्ये अजूनपर्यंत पावसाचे पाणीच साचले नाही. असे शेतकरी आपण केव्हा रोवणी करु अशा आशेत असून दररोज दमदार पावसाची वाट पाहत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
इंदोरा (बुजरुक) : तिरोडा तालुक्यात पावसाअभावी रोवण्या बंद असून शेतकरी चिंताग्रस्त आहे. मागील ८-१० दिवसांपासून पाऊस नसल्याने शेतकरी दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहे.
तालुक्यात ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे त्यांचे रोवणीचे काम सुरु आहे. पण ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाचे साधन नाही किंवा वरथेंबी जमीन आहे त्या शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये अजूनपर्यंत पावसाचे पाणीच साचले नाही. असे शेतकरी आपण केव्हा रोवणी करु अशा आशेत असून दररोज दमदार पावसाची वाट पाहत आहे. सध्या परिसरात नदी किनाऱ्यालगतच्या ज्या शेती आहेत त्यांनी नदी काठावर विद्युत मोटार पंप लावून रोवणी सुरु केली आहे. यात करटी खुर्द, इंदोरा बुज., बिहिरीया, चांदोरी खुर्द, सावरा, पिपरीया, अर्जुनी येथील शेतकऱ्यांनी विद्युत पंपाद्वारे रोवणी करीत आहेत.तसेच ज्यांच्याकडे विहीर व तलाव आहेत त्यांचे सुद्धा रोवणीचे काम सुरु आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे ओलीताचे कुठलेच साधन नाही ते अजून रोवणी करण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
मागील १३ जुलैपासून ढगाळ वातावरण व पाऊस येईल असे वातावरण असताना सुद्धा दमदार पावसाने हजेरी लावली नाही. कुठे-कुठे थोडाफार पाऊस झाला. परंतु शेतात पाणी साचले नाही. पावसाळा लागला तेव्हापासून तालुक्यात जोरदार पाऊस झालाच नाही व तलाव, नाले अजून भरले नाहीत. मृग नक्षत्रामध्ये धानाची पेरणी झाली व फक्त रोपे जगण्या पुरताच पाऊस आला. आता पुनर्वसू नक्षत्र संपणार आहे. १९ जुलैपासून पुष्प नक्षत्र लागणार आहे. या नक्षत्राचे वाहन हत्ती असून या नक्षत्रामध्ये हत्ती सोंड हलवितो का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांना रोवणीसाठी पाणी मिळावे म्हणून धापेवाडा उपसा सिंचन योजनेमधून चोरखमारा, बोदलकसा, खैरबंधा तलावामध्ये पाणी सोडण्यात आले. सिंचन योजनेतून तलावात पाणी गेले ही असेल. परंतु खैरबंधा जलाशयाचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत केव्हा येईल व रोवणीच्या कामाला केव्हा सुरुवात होईल याचीही चिंता शेतकऱ्यांना आहे.
या जलाशयाच्या शेवटच्या टोकावरची गावे अर्जुनी, परसवाडा, बघोली, इंदोरा बुज., बिहिरीया, करटी बुज., करटी खुर्द, खैरलांजी, सावरा, पिपरीया, गोंडमोहाळी, किंडगीपार ही आहेत. या गावातील शेतकऱ्यांपर्यंत पाणी येईल का यात शंकाच वाटत आहे. तेव्हापर्यंत जुलै महिना संपेल व ऑगस्टच्या २ तारखेला आलेल्या नक्षत्राची सुरुवात होईल. या चिंतेमध्ये शेतकरी लागला आहे. तेव्हा परिसरात दमदार पाऊस केव्हा होईल या आशेवर शेतकरी आहे.
ज्यांनी रोवणी केली तेही शेतकरी दु:खी आहेत. कारण रोवणी करुन पाणी नसल्याने पऱ्हे वाळलेली आहेत. ज्यांची रोवणी झाली नाही तेही शेतकरी दु:खी आहेत. कारण शेतामधील खारी सुद्धा पिवळ्या पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.