लागवड उसाची नोंद धानाची!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 05:00 AM2020-06-24T05:00:00+5:302020-06-24T05:00:15+5:30
शेतकरी आपल्या शेतात वर्षभर काबाडकष्ट आणि रक्ताचे पाणी करुन आपल्या कुटुंबासह राबतात.मात्र शेतकऱ्यांच्या हाती शेतमाल आल्यानंतर त्याला योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी वर्षभर घेतलेल्या कष्टावर पाणी फेरले जात आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत धान खरेदी केली जाते. मात्र आता शेतकऱ्यांना मिळणाऱ्या हमीभावावर सुध्दा डल्ला मारण्याचा प्रयत्न काही व्यापारी करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावरुन हमीभावाने धान खरेदी केली जाते. मात्र काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून कमी दराने धान खरेदी करुन त्याची शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री करण्यासाठी सातबारा गोळा करुन उसाऐवजी धानाची लागवड केल्याची नोंद करुन धानाची विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास यातील मोठा घोळ बाहेर येण्याची शक्यता आहे.
शेतकरी आपल्या शेतात वर्षभर काबाडकष्ट आणि रक्ताचे पाणी करुन आपल्या कुटुंबासह राबतात.मात्र शेतकऱ्यांच्या हाती शेतमाल आल्यानंतर त्याला योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी वर्षभर घेतलेल्या कष्टावर पाणी फेरले जात आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत धान खरेदी केली जाते. मात्र आता शेतकऱ्यांना मिळणाऱ्या हमीभावावर सुध्दा डल्ला मारण्याचा प्रयत्न काही व्यापारी करीत आहे. रब्बी हंगामात शेतकऱ्यांकडून कमी दराने धानाची खरेदी करुन हाच धान शासकीय धान खरेदी केंद्रावर काही व्यापाऱ्यांनी विकल्याची माहिती आहे. यासाठी व्यापाऱ्यांनी काही शेतकऱ्यांना प्रती क्विंटल शंभर रुपये देण्याचे आमीष देऊन त्यांचे सातबारा गोळा केले.
विशेष म्हणजे हे सातबारा गोळा करताना ज्या शेतकऱ्यांच्या शेतात ऊसाची लागवड केली आहे त्यांच्या सातबारा तलाठ्याच्या मदतीने धानाची लागवड केल्याची नोंद केली. याच सातबारावर शासकीय धान खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात धानाची विक्री केल्याची माहिती आहे. यासाठी त्यांनी काही केंद्रावरील कर्मचाऱ्यांची सुध्दा मदत घेतल्याचे बोलले जाते. हा प्रकार सर्वाधिक धान उत्पादक तालुके असलेल्या अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी तालुक्यात घडला आहे. विशेष म्हणजे कृषी विभागाच्या नोंदी नुसार गेल्या हंगामात १५०० हेक्टरवर ऊसाची लागवड करण्यात आली होती. कोणत्या शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड केली याची नोंद सुध्दा कृषी विभाग आणि तलाठी कार्यालयाकडे आहे.
मात्र प्रत्यक्षात सातबारावर पीक लागवड नोंद करताना त्यात ऊसाची लागवड केली असताना धानाची लागवड केल्याचा सातबारा तयार करुन दिला.
व्यापाऱ्यांनी असेच सातबारा जमा करुन याच मदतीने शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री केल्याची माहिती आहे. त्यामुळे शासकीय धान खरेदी केंद्रावर जमा करण्यात आलेले सातबारा आणि शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात कोणत्या पिकाची लागवड केली आहे याची सखोल चौकशी केल्यास खरे गौडंबगाल पुढे येण्याची शक्यता आहे. शेतकºयाचा नावावर फायदा घेणाऱ्यांचा खरा चेहरा सुध्दा सामोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लगतच्या राज्यातील धान गोंदियात
शासकीय धान खरेदी केंद्रावरील गौडबंगालाची सखोल चौकशी केल्यास बरेच मोठे गबाड बाहेर येण्याची शक्यता आहे. लगतच्या छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातून कमी दराचा धान आणून त्याची जिल्ह्यातील काही धान खरेदी केंद्रावर विक्री करण्यात आल्याची माहिती आहे.याला एका व्यापाऱ्यांनेच नाव लिहिण्याच्या अटीवर सांगितले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याची सखोल चौकशी केल्यास भिंग फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सहकारी संस्थेच्या सभेत गाजला होता मुद्दा
अर्जुनी मोरगाव येथे काही दिवसांपूर्वी सेवा सहकारी संस्थेच्या सभेत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काही पदाधिकाऱ्यांनी शासकीय धान खरेदी केंद्रावर बाहेरील जिल्हा आणि राज्यातून धान आणून विक्री करण्यात आल्याची बाब लक्षात आणून दिली होती. त्यामुळे संबंधित विभागाने सुध्दा हा मुद्दा गांर्भियाने घेण्याची गरज आहे.
शेतकऱ्यांच्या कोऱ्या विड्रॉलवर सह्या
व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणीचा फायदा घेत त्यांना आमिष दाखवित त्यांचे सातबारा गोळा करुन त्यांच्या नावावर शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री केली. धानाचे चुकारे हे शेतकऱ्यांच्या बँका खात्यावर जमा होत असल्याने चुकारे जमा झाल्यानंतर ते पैसे विड्राल करता यावे, यासाठी शेतकºयांच्या कोऱ्या विड्रालवर सह्या आधीच घेवून ठेवल्याची माहिती आहे.