प्लाझ्मा डोनर तयार मात्र यंत्रसामुग्रीचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 05:00 AM2020-09-11T05:00:00+5:302020-09-11T05:00:40+5:30
रक्तदाना इतकेच प्लाझ्मा दान श्रेष्ठ दान आहे. प्लाझ्मा दान केल्याने काहीही त्रास होत नाही. यामुळे एखाद्या रुग्णाचा जीव वाचविणे शक्य आहे. जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १४०० वर आहे. यातील बरेच जण प्लाझ्मा दानासाठी पात्र असू शकतात. सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून अती गंभीर रुग्णांचे प्रमाण सुध्दा वाढत आहे. या रुग्णांना वेळीच उपचार न मिळल्याने त्यांचा मृत्यू होत आहे.
अंकुश गुंडावार।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात कोविडच्या गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी उपयुक्त ठरत आहे. प्लाझ्मा दान करण्यासाठी जिल्ह्यातील डोनर पुढे येत आहेत. पण त्यासाठी मेडिकलमध्ये आवशक यंत्र सामुग्री आणि यातील स्पेशालिस्ट डॉक्टर उपलब्ध नसल्याने अद्यापही प्लाझ्मा डोनेट करण्याची प्रक्रिया येथे सुरू झालेली नाही.
रक्तदाना इतकेच प्लाझ्मा दान श्रेष्ठ दान आहे. प्लाझ्मा दान केल्याने काहीही त्रास होत नाही. यामुळे एखाद्या रुग्णाचा जीव वाचविणे शक्य आहे. जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १४०० वर आहे. यातील बरेच जण प्लाझ्मा दानासाठी पात्र असू शकतात. सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून अती गंभीर रुग्णांचे प्रमाण सुध्दा वाढत आहे. या रुग्णांना वेळीच उपचार न मिळल्याने त्यांचा मृत्यू होत आहे. कोविडच्या अति गंभीेर रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी ही उपयुक्त ठरत आहे. गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्यांपैकी ४० जणांनी प्लाझ्मा दान करण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र गोंदिया येथील मेडिकलमध्ये अद्यापही ही सुविधा नसल्याने कोविडच्या गंभीर रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी करण्यासाठी डोनर तयार असताना सुध्दा त्याचा कसलाच उपयोग होत नसून त्यांना नागपूरला रेफर केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे. मेडिकल कॉलेजच्या व्यवस्थापनाने प्लाझ्मा थेरपी सुरू करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. यासाठी ९ स्पेशालिस्ट डॉक्टर आणि यंत्रसामुग्रीची मागणी केली आहे. यासंबंधिचा प्रस्ताव दोन महिन्यापूर्वीच शासनाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र त्याला अद्यापही मंजुरी मिळाली नसल्याने प्लाझ्मा डोनेट करण्याची प्रक्रिया अजुनही सुरू झालेली नाही.त्यामुळेच कोविडच्या गंभीर रुग्णांना नागपूर येथे रेफर केले जात आहे. तीन दिवसांपूर्वीच गोंदिया येथील ६० वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाल्याने प्रकृती गंभीर झाली होती.
ोथील डॉक्टरांनी प्लाझ्मा थेरपी केल्यास प्रकृतीत सुधारणा होवू शकते असे रुग्णाच्या नातेवाईकाला सांगितले. यानंतर रुग्णाच्या नातवाईकांना प्लाझ्मा डोनर शोधला मात्र मेडिकलमध्ये ही सुविधा नसल्याने त्या रुग्णाला नागपूरला रेफर केल्या शिवाय पर्याय उरला नाही.असेच प्रसंग मागील दोन महिन्यात अनेकदा निर्माण झाले. खासगी रुग्णालयात जाऊन ही प्रक्रिया करणे थोडे खर्चिक आहे. त्यामुळे अनेकजण आधी शासकीय रुग्णालयात जातात. मात्र येथील मेडिकलमध्ये अजूनही अनेक सोयी सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांना नागपूरपर्यंत पायपीट करावी लागत आहे.
समुदेशनाचा अभाव
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठया प्रमाणात वाढत आहे. आतापर्यंत अडीच हजारावर नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील चांगले असून १४०० वर रुग्णांना कोरोनावर मात केली आहे. मात्र कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना सुटी देताना त्यांचे योग्य समुपदेशन करुन प्लाझ्मा दान करण्यासाठी त्यांचे अभिप्राय घेवून आणि त्यांची संपूर्ण माहिती रुग्णालय किवा कोविड केअर सेंटरमध्ये ठेवणे आवश्यक आहे. मात्र जिल्ह्यात याबाबतीत कोरोनामुक्त झालेल्यांचे समुपदेशन केले जात नसल्याची माहिती आहे.प्लाझ्मा दानासाठी योग प्रकारे समुपदेशन करता येणे महत्त्वाचे आहे. प्लाझ्मा दान हे श्रेष्ठ दान असून हा विश्वास दान करण्याला वाटणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी याचे प्रबोधन करण्याची गरज आहे. कोरोना विरुध्दचा लढा लढताना हे एक महत्त्वपूर्ण शस्त्र आहे.