सातशेवरुन प्लॅटफार्म तिकीट विक्री ८५ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 06:00 AM2020-03-21T06:00:00+5:302020-03-21T06:00:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने गुरूवारपासून येथील रेल्वे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने गुरूवारपासून येथील रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म तिकीटाचे दर ५० रुपये केले. याचा पहिल्याच दिवशी परिणाम दिसून आला. दररोज ७०० प्लॅटफार्म तिकीटांची विक्री एकदम ८५ वर आली असून दरवाढीचा प्लॅटफार्म तिकीट विक्रीवर परिणाम दिसून आला.
महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे.यासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहे. रेल्वे स्थानकावर सुध्दा मोठ्या प्रमाणात प्रवाशी आणि त्यांच्या नातेवाईक व मित्र परिवाराची गर्दी होत असते.
यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक हे एक महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक असून या रेल्वे स्थानकावरुन दररोज दीडशे रेल्वे गाड्या धावतात. तसेच दररोज २५ हजारावर प्रवाशी ये-जा करतात. त्यामुळे रेल्वे स्थानकावर गर्दी होत असते. तर बरेच जण प्लॅटफार्म तिकीट काढून आपल्या नातेवाईक अथवा मित्राला सोडण्यासाठी रेल्वे स्थानकावर येत असतात. प्लॅटफार्म तिकीट केवळ दहा रुपयाला मिळत असल्याने ते कुणीही सहज काढत होते. मात्र रेल्वे विभागाने रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी गुरूवारपासून येथील रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म तिकीटाचे दर ५० रुपये केले. त्यामुळे अनेक जणांनी रेल्वे स्थानकावर न जाताच बाहेरून सोडून जाणे पसंत केले. त्यामुळे दररोज ७०० प्लॅटफार्म तिकीटांची होणारी विक्री एकदम ८५ तिकीटांवर आली.
कोरोनामुळे रेल्वे गाड्यांमधील गर्दी सुध्दा कमी झाली असून अनेकांनी आपले प्रवासाचे नियोजित वेळापत्रक रद्द केले आहे. त्यामुळे मागील तीन दिवसात २४०० वर प्रवाशांनी आरक्षीत तिकीट रद्द केले. रेल्वे आरक्षण तिकीटाच्या १० लाख रुपयांचा परतावा केला आहे.तर गोंदिया रेल्वे स्थानकावरील सहा आरक्षण खिडक्यांवर प्रवाशांचा शुकशुकाट होता.
दोन प्रवाशात १ मिटरचे अंतर
गोंदिया रेल्वे स्थानकावरील तिकीट विक्री केंद्र आणि रेल्वे आरक्षण खिडक्यांवर तिकीट काढण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांमध्ये १ मिटरचे अंतर राहावे यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली. यासाठी एक एक मिटर अंतरावर लाल रंगाची लाईन ओढून तशी व्यवस्था करण्यात आली होती. ही सर्व उपाय योजना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असल्याचे रेल्वे विभागाचे मुकेश कुमार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
लांब अंतरावरील रेल्वे गाड्या रद्द
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे विभागाकडून दक्षता घेतली जात आहे. याच पार्श्वभुमीवर हमसफर एक्सप्रेस, अंत्योदय एक्सप्रेस, समता एक्सप्रेस आणि हावडा-मुंबई, मुंबई-हावडा या रेल्वे गाड्या सुध्दा रद्द करण्यात आल्या आहे.