देवरी-चिचगड राज्य मार्गाची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 10:38 PM2018-11-15T22:38:11+5:302018-11-15T22:38:32+5:30
देवरी-चिचगड हा राज्य मार्ग पूर्णपणे उखडला असून रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. त्यामुळे या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या नागरिकांना व वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील खड्यांमुळे या मार्गावरील अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : देवरी-चिचगड हा राज्य मार्ग पूर्णपणे उखडला असून रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. त्यामुळे या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या नागरिकांना व वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील खड्यांमुळे या मार्गावरील अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.
देवरी सार्वजनिक बांधकाम उपविभागातंर्गत हा रस्ता येत असून रस्त्याचे डांबरीकरण योग्य न करण्यात आल्याने अल्पावधीतच या रस्त्याचे बारा वाजले आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वीच याच मार्गावरील खड्डयामुळे झालेल्या अपघातात एक वाहन चालक गंभीर जखमी झाला. तर ८ नोव्हेंबरला झालेल्या अपघातात धनराज किशन चनाप याचा मृत्यु झाला. कारु राऊत हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.
रस्त्यांवरील खड्डयांमुळे एका जणाला जीव गमवावा लागला तर अनेक जण जखमी झाले. मात्र यानंतरही कुंभकर्णी झोपेत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना जाग आलेली नाही. यापुर्वी आमगाव-देवरी मार्गावरील खड्डयांमुळे एका पोलीस कर्मचाºयाचा मृत्यू झाला. तेव्हा कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. देवरी-चिचगड हा डांबरी मार्ग असून तो अल्पावधीत पूर्णपणे उखडल्याने बांधकामात वापरण्यात आलेल्या साहित्यावर सुध्दा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे याच मार्गावरुच आमदार, खासदार, जि.प.चे बांधकाम सभापती व अन्य लोकप्रतिनिधी देखील ये-जा करतात. मात्र त्यांचे सुध्दा या रस्त्याच्या समस्येकडे लक्ष न गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सिंदीबिरी गावाजवळ पुलावर दहा पंधरा दिवसांपूर्वी अपघात होवून एकाचा बळी गेल्याची घटना घडली आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र रोष व्याप्त आहे. चिचगड ते ककोडी रसत्यावरील बहुतांश पुलाची स्थिती बिकट आहे. तर चिचगड-ककोडी हा रस्ता तीन ते चार महिन्यापूर्वीच तयार करण्यात आला आहे. या कामासाठी २ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र अल्पावधीत रस्ता पूर्णपणे उखडला असल्याने बांधकामावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.