भूखंड व्यवसायिकांचा ‘ओपन स्पेस’ घोटाळा

By admin | Published: July 17, 2017 01:14 AM2017-07-17T01:14:04+5:302017-07-17T01:14:04+5:30

भूखंड व्यवसायातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या भूखंड व्यावसायिकांची लालसा पुढे गेल्याने नियमात

Plot of businessmen's open space scam | भूखंड व्यवसायिकांचा ‘ओपन स्पेस’ घोटाळा

भूखंड व्यवसायिकांचा ‘ओपन स्पेस’ घोटाळा

Next

नियमबाह्य विक्री : परिसर विकासाचीही विल्हेवाट
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : भूखंड व्यवसायातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या भूखंड व्यावसायिकांची लालसा पुढे गेल्याने नियमात ठरलेली भूमी विक्री करुन त्याची विल्हेवाट लावली जात आहे. भूखंडावर असलेले ओपन स्पेससुद्धा त्यांनी विक्री करुन शासनाच्या नजरेत धूळ टाकली आहे.
आमगाव शहर औद्योगिक, शैक्षणिक व कुशल कामगार क्षेत्राची बाजारपेठ आहे. स्थानिकांसह विविध स्थलांतरित लोकांच्या राहणीमानाचा कल या परिसराकडे आहे. मुबलक दरात नागरिकांना भूखंड उपलब्ध व्हावे, यासाठी व्यावसायिकांचे प्रयत्न आहे.
आमगाव तालुक्याचे भौगौलिक परिक्षेत्र ३२१०५.६७ हेक्टर आहे. त्यात कृषी भूमी २१९३७.०१ इतकी आहे. उर्वरित भाग महसूल क्षेत्रात आहे. आमगाव, बनगाव, पदमपूर, किंडगीपार, माल्ही, कुंभारटोली व रिसामा या भौगौलिक क्षेत्रात अनेक भूखंड व्यावसायिकांनी भूखंड विक्री व्यवसाय सुरू केले आहे. त्यासाठी रितसर परवानगी घेण्यात आली. त्यात भूखंड परिसरातील विकासाची हमी अंतर्भूत असल्याने ते मान्य केले. परंतु प्रत्यक्षात ज्या शेतजमिनीची खरेदी करुन भूखंड निर्माण करण्यात आले, त्या परिसरात विद्युत पुरवठा, सांडपाणी जाणारे गटारे, रस्ते व स्वच्छता या मुलभूत गरजांकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे नव्याने निर्माणाधिन लोकवस्तीतील नागरिक आजही मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत.
व्यावसायिकांनी अनेक भागात भूखंड विक्रीकरिता मालकी तयार केली. भूखंड विक्री व्हावे यासाठी जमिनीच्या आराखड्यास शासनाच्या विविध विभागाकडून मंजूर करून घेतले. आराखड्यात नियमाप्रमाणे जमिनीच्या टक्केवारीनुसार नागरिकांना सुविधा पुरविण्यासाठी ओपन स्पेसची जागा नियमात घातल्या गेली.
या ओपन स्पेस जागेवर सुविधेप्रमाणे क्रीडांगण, बाग, स्वच्छता गृह अशा विविध बाबी अंतर्भूत करुन देण्यात आल्या तर या जमिनीचे ओपन स्पेस जागेसंबंधित क्षेत्रातील ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद अशा यंत्रणेची मालकी म्हणून रितसर सातबारा तयार करुन हस्तांतरित करणे आवश्यक आहे. परंतु प्रत्यक्षात या ओपन स्पेसच्याच विक्रीचा गोरखधंदा भूखंड व्यावसायिकांनी सुरू केला आहे.
या व्यावसायिकांनी भूखंड विक्रीचा आराखडा मंजूर करताना रस्त्याची रुंदी पूर्वी ६ मीटर तर नंतर ९ मीटर असे मंजूर करून घेतले. यातही त्यांनी रस्ते अरुंद करुन त्यातील भूखंड मोठे करुन विक्री करुन घेतले आहे.
भूखंड व्यावसायिकांनी ओपन स्पेस विक्री करताना खरेदीधारकांची दिशाभूल केली. परंतु जमिनीची विक्री करणारे व विक्री पत्राप्रमाणे भूखंडाची फेरफार नोंदणी करणाऱ्या विभागाने यात कोणती भूमिका बजावली, हा संशोधनाचा विषय आहे. तालुक्यात अनेक नवीन जमिनीवर भूखंड तयार करुन नागरिक वसत्या अस्तित्वात आल्या. नवीन नगरात राहणीमान वाढले, पंरतु याच भूखंड परिसरातील ओपन स्पेस जागा विक्री झाल्याची बाब समोर आली. या लोकवस्तीतील रस्ते, सांडपाणी जाणारे गटारे, विद्युतची सोय व स्वच्छता गृहे यांची बिकट समस्या निर्माण झाली आहे. भूखंड व्यावसायिकांनी अनेक नगरातील ओपन स्पेस विक्री केले. यावेळी भूमापन विभाग, महसूल विभाग व मुद्रांक नोंदणी विभाग यांनी या अनधिकृत जागेची विक्री व फेरफार नोंदणी केली कशी? असा प्रश्न पडला आहे. या ओपन स्पेस भूखंडाची विक्री करणाऱ्या व्यक्तीचे घबाड बाहेर पडणार काय? याची उत्सुकता लोकांना आहे.

Web Title: Plot of businessmen's open space scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.