सहाशे रुपयांची नांगरणी आता हजारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:22 AM2021-06-02T04:22:43+5:302021-06-02T04:22:43+5:30
संतोष बुकावन अर्जुनी मोरगाव : वर्तमान युग हे यांत्रिकीकरणाचे आहे. हल्ली शेतीची बहुतांश कामे यंत्रांनीच केली जातात. यंत्र म्हटलं ...
संतोष बुकावन
अर्जुनी मोरगाव : वर्तमान युग हे यांत्रिकीकरणाचे आहे. हल्ली शेतीची बहुतांश कामे यंत्रांनीच केली जातात. यंत्र म्हटलं की त्याचा थेट संबंध इंधनाशी असतो. इंधनाचे दर दैनंदिन वाढत आहेत. या दरवाढीचा थेट परिणाम आता लागवड खर्चावर होऊ लागला आहे. रब्बी हंगामात सहाशे रुपये प्रतिएकर होणाऱ्या शेत नांगरणीचे दर डिझेल वृद्धीमुळे आता एक हजार रुपये झाले आहेत.
पूर्व विदर्भात धानशेती केली जाते. पूर्वीच्या काळी शेतीची अनेक कामे पशुधनाने केली जात होती. हल्ली पशुधनाची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. सुमारे ७० टक्के शेतकरी ट्रॅक्टरने शेती करतात. १५ ते २० टक्के शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर नाहीत. ते भाड्याने ट्रॅक्टरची व्यवस्था करून शेती करतात. उर्वरित शेतकरी पशुधनाने शेती करतात. शेती व्यवसायात यंत्रवापरामुळे खर्च वाढला आहे; मात्र शारीरिक श्रम कमी झाले आहेत. यंत्रांच्या अति वापरामुळेच पशुधन कमी झाल्याचे चित्र ग्रामीण भागात बघावयास मिळते.
शेतीला पूरक म्हणवणारा पशुपालनाचा उद्योग गावागावातून हद्दपार होतोय. दावणीला बांधलेल्या बैलांची जोडी गरजा भागवायला कामी यायची, पण हे पशुधनच काळाच्या ओघात हरवले आहे. शेतकऱ्यांचे गोठेच दिसत नाहीत. पोळ्यात तोरणाखाली न्यायला बैल नाहीत. अशी आधुनिक शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत डिझेलचे दर प्रचंड वाढले आहेत. अद्याप वाढ सुरूच आहे. शेतीची बहुतांश कामे यंत्राने होतात व यंत्राला इंधन लागतो. आपसुकच शेतीचा खर्च महागला आहे.
.......
वर्षभरात डिझेलच्या दरात २३ रुपये ८२ पैशांनी वाढ
गतवर्षी ३१ मे रोजी डिझेलचे दर प्रतिलिटर ६८ रुपये १७ पैसे होते. आजचे दर ९१ रुपये ९९ पैसे आहेत. म्हणजे वर्षभरात तब्बल २३ रुपये ८२ पैसे वाढ झाली आहे. मात्र आधारभूत हमी भावात वाढ करताना धानपिकात प्रतिक्विंटल ५० रुपये अशी तुटपुंजी वाढ केली जाते.
.....
कृषी साहित्यही महागले
डिझेलशिवाय बी-बियाणे, खते, कृषी अवजारे व इतर शेतीपयोगी साहित्यात वाढ होते, ती वेगळीच. हा सर्व महागाईचा आलेख वाढत असताना, त्यातुलनेत हमीभाव का वाढत नाही, हा खरा चिंतनाचा प्रश्न आहे. लागवड खर्चाच्या दीडपट उत्पन्न देण्याची मुक्ताफळे उधळणारी मंडळी गेली तरी कुठे? हा प्रश्न जगपोशिंद्यांना पडला आहे.