पाच दिवसांपासून नळ योजना बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:29 AM2021-04-01T04:29:50+5:302021-04-01T04:29:50+5:30
इंदोरा बुजरुक : तिरोडा पंचायत समितीअंतर्गत बोदा येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गावात मागील पाच दिवसांपासून ...
इंदोरा बुजरुक : तिरोडा पंचायत समितीअंतर्गत बोदा येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गावात मागील पाच दिवसांपासून वाॅर्ड क्र.१ व वाॅर्ड क्र. २, ३च्या काही भागांत नळाला पाणी येत नसल्याने गावकऱ्यांना गावाच्या बाहेरून २ किलोमीटर अंतरावर पाणी आणावे लागत आहे. यामुळे भर उन्हाळ्यात गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
शासनाकडून मागील पाच सहा वर्षांपूर्वी ५० लाख रुपये खर्चून गावात पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली, पण ग्रामपंचायतने त्याची योग्य देखभाल दुरुस्ती केली नाही. परिणामी, वॉटर फिल्टर बंद अवस्थेत असून, अधूनमधून पाणीपुरवठा कमी होत आहे. कोरोना काळात ग्रामसभा होत नसल्याने ग्रामपंचायतचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप आहे. पाच दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प असूनही त्याची पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. याची साधी सूचना वा दवंडीद्वारे याची माहिती नागरिकांना देण्यात आली नाही. त्यामुळे गावकऱ्यांना भर उन्हात पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे.
.....
मागील पाच दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प असल्याने, गावकऱ्यांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे, पण याची अद्यापही दखल ग्रामपंचायतने घेतली नाही. त्यामुळे मी ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण करणार आहे.
- सुनील नागदेवे, ग्रामपंचायत सदस्य बोदा