धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट
By Admin | Published: May 26, 2016 12:50 AM2016-05-26T00:50:47+5:302016-05-26T00:50:47+5:30
तालुक्यात आठ ठिकाणी उन्हाळी धान खरेदी करण्यासाठी आधारभूत धान खरेदी केंद्र उघडण्यात आले.
अर्जुनी-मोरगाव : तालुक्यात आठ ठिकाणी उन्हाळी धान खरेदी करण्यासाठी आधारभूत धान खरेदी केंद्र उघडण्यात आले. मात्र या केंद्रावर शेतकऱ्यांची लुबाडणूक केली जात आहे. लुबाडणूक थांबवून शेतकऱ्यांना तत्काळ धानादेश द्यावे, असे निवेदन जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहे. तालुक्यातील धान खरेदी केंद्रावर साध्या वजनकाट्यांवर मोजमाप केले जाते. इलेक्ट्रॉनिक्स वजनकाटे असतानाही हेतूपुरस्परपणे साध्या वजनकाट्यावर मोजणी केली जाते. खरेदी केंद्रावर विद्युत व्यवस्था नसल्याने बॅटरी चार्ज होत नाही, असा बहाणा केला जातो. साध्या वजनकाट्यावर वजनाच्या बाजूने एक किलो जादाचे वजन घेतल्या जाते. प्रति कट्टा पाच रुपये याप्रमाणे हमाली दर आकारणी केली जाते. सर्वसाधारण शेतकऱ्यांना मोजमापासाठी रात्रदिवस जागावे लागते. तर पदाधिकारी व स्नेहीजणांचे धान प्राधान्याने मोजले जातात. यावर्षी धान पिकाचे उत्पादन चांगले आहे. जिल्हा विपणन अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, प्रति एकर १५ क्विंटल धान खरेदी केले जात आहेत. त्यामुळे उर्वरित धान कुठे विक्री करावे, हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. एकरी २० क्विंटल याप्रमाणे धान खरेदीचे आदेश निर्गमित करावे. धान विक्री केल्यानंतरही चुकारे मिळण्यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागते. लवकरच शेतकऱ्यांना पुढील हंगामाची तयारी करावी लागणार आहे. बी-बियाणे खरेदीसाठी कृषी केंद्रावर होणारी गर्दी लक्षात घेता तत्काळ चुकारे देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिलेल्या निवेदनातून केली आहे. या वेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जि.प. सदस्य किशोर तरोणे, उध्दव मेहेंदळे, मनोहर शहारे, अरुण ढवळे, विलास राऊत व कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)